सत्तेपूर्वीच CM पदासाठी कुस्ती… महाविकास आघाडीतील खडाखडीचा महायुतीला फायदा होणार?
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एका बाजूला हा अजेंडा सेट करत आहेत. ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे कसे योग्य दावेदार आहेत, हे ठसवून देत आहेत. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या नेत्यांचा वेगळाच सूर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) एक म्हणतात, बाळासाहेब थोरात राऊतांचे म्हणणे टोलावून लावतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) न्यूट्रल मत मांडतात आणि त्यावर शरद पवार हे दुजोरा देतात. एरव्ही चव्हाणांशी 10 टक्के सुद्धा न पटणारे पवार या मुद्द्यावर मात्र चव्हाणांशी 100 टक्के सहमत होतात. या सगळ्यावरुन एकच दिसून येते की लोकसभेनंतर अंगावर मूठभर जास्त मांस चढलेले महाविकास आघाडीचे नेते आपल्याच पक्षाचा कसा मुख्यमंत्री होईल यासाठी प्रयत्न करत आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत कसे खटके उडत आहेत, पाहुया या व्हिडीओमधून.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा महाविकास आघाडीचा रोज नवा फॉर्म्युला बाहेर येत आहे. त्या पक्षांच्या नेत्यांकडूनही वेगवेगळे फॉर्म्युले सांगितले जात आहेत. पण जागा वाटपात निश्चित नसताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरून तिन्ही पक्षांमध्ये खडाखडी सुरू झालीय. संजय राऊत यांनी सर्वात आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याचा उच्चार करत हा वाद निर्माण केलाय. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे संजय राऊत म्हणत आहेत. ते पत्रकार परिषद, जाहीर सभांमध्ये तसे म्हणत आहेत. या विधानावर काँग्रेसकडून थेट उत्तर दिली जात आहेत. नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल, असे नाना पटोले हे सांगत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही यांनी संजय राऊतांची मागणी टोलवून लावलीय. संजय राऊत काय म्हणतात आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात याला काही अर्थ नाही. ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यावेळी त्यावर निर्णय होईल. काँग्रेसकडे चेहरे पण आहेत आणि ताकद ही आहे. ही वस्तूस्थिती राऊतांनी स्वीकारली पाहीजे असे थोरात म्हणाले. त्यावर संजय राऊत हे शांत बसतील ते काय ? नाना पटोले यांची अडचण समजू शकतो. सर्वांची बाजू समजू शकतो. पटोले आमचे मित्रच आहेत. नाना पटोले यांच्या मनात एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्यांनी सांगावं. पण आम्ही राज्यातील अकरा कोटी लोकांच्या मनात कोणता चेहरा आहे त्याबद्दल बोलत आहोत मला हे बोलण्याचा अधिकार आहे, असे संजय राऊतांनी जाहीर केले.
भाऊबीज परत घेतली जात नाही; सावत्र भावाची उपमा देत फडणवीसांचं विरोधकांना उत्तर
त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल, असे काँग्रसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यावर शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखे नाही, याची कबुली देत एकप्रकारे त्यांच्या मताला दुजोराच दिला. एरवी पवार महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रादेशिक पातळीवरच्या नेत्याच्या अडचणीच्या ठरणाऱ्या वक्तव्याकडे एकतर दुर्लक्ष तरी करतात किंवा खिल्ली उडवून मोकळे होतात. राज ठाकरे असतो, नाना पटोले असतो, भाजपमधील प्रादेशिक नेते असोत किंवा अगदी उद्धव ठाकरेही असतो. अनेक वक्तव्यांना पवार जुमानत नाहीत. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत अनेक कारणांवरुन विसंवाद असतानाही पवारांनी तसे केले नाही. किंबहुना तसे करू शकले नाहीत. कारण पृथ्वीराज चव्हाण हे केवळ काँग्रेस मधले प्रादेशिक पातळीवरचे नेते नाहीत, तर ते केंद्राने महाराष्ट्रात पाठविलेले नेते आहेत. सोनिया गांधींचे विश्वासू आहेत. त्यांचा शब्द राहुल गांधी, पक्षप्रमुख मलिकार्जुन खरगेही मानतात. त्यामुळे चव्हाण यांचे मत किती महत्वाचे आहे, हे पवारही जाणतात.
फडणवीसांनी सगळ्यांना पाणी पाजले पण मी त्याला वस्ताद भेटलो; जरांगेंचा बोचरा वार
आता मुद्दा राहतो तो मग शरद पवार किंवा उद्धव ठाकरे सहजासहजी डाव सोडून देतील का? काँग्रेससाठी महाराष्ट्र हे अति महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा आपल्या ताब्यात कसा येईल, हे काँग्रेसच्या डोक्यात आहे. लोकसभेच्या कामगिरीच्या जोरावर जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन निवडून आणण्याचा आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकण्याचे उद्दिष्ट काँग्रेसचे आहे. परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे असा अगदी सहजासहजी डाव सोडून देतील का? त्यामुळे जागा वाटपामध्येच मोठा संघर्ष होऊ शकतो. त्यानंतरही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्ष एकमेंकाचे काम करतील का? उमेदवारी न दिल्यास अपक्ष उमेदवार देऊन पाडापाडीचे राजकारण होऊ शकते का? आणि यााचा फायदा महायुतीला होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हा वाद सामोपचाराने मिटवावा लागणारच आहे.