Chandrasekhar Bawankule : फडणवीस यांच्यावर टीका करतांना तोंड सांभाळून बोला, तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही
मुंबई : शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) या महिला कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचा आणि गृहमंत्री देवेंद्र फडवीसांचा (Devendra Fadvis) जोरदार समाचार घेतला. आपल्याला फडतूस गृहमंत्री लाभला, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
बावनकुळे यांनी तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा ठाकरेंना दिला. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना तोंड सांभाळून बोला. अडीच वर्षात तुमची फडतूस कामिगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही, अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.
मा. @Dev_Fadnavis जी यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी!
अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही.#FadtusUddhav
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 4, 2023
आज एका पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर टीकेची तोफ डागली होती. आपल्याला फडतूस गृहमंत्री लाभला. अत्यंत लाचार, लाळघोटेणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून फक्त मिरवत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतांना हा माणूस हालायलाही तयार नाही. अशा फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, त्यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरेंनी केली होती. त्याला आता बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावर जयंत पाटील बोलले
दरम्यान, आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंवर पलटवार केला. तुमचा अडीच वर्षाचा कारभार बघीतल्यानंतर नेमकं कोण फडतूस आहे, हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, आता यावर ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.