Laxman Jagtap यांच्या पत्नीने घेतला उमेदवारी अर्ज; भाजपाचा अधिकृत उमेदवार ठरला?
मागच्या काही दिवसापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार ? याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यावर आज अखेर भाजपाकडून अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.
अश्विनी जगताप यांनी अर्ज विकत घेतल्यामुळे त्याच भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहेत का? अशी चर्चा सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झाली आहे. एकीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील पोटनिवडणूकिसाठी इच्छुक आहेत. भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू असताना आता अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. भाजपाकडून आणखी कोणी उमेदवारी अर्ज घेणार का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु, राष्ट्रवादीकडून आज नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी अर्ज विकत घेतला असून काल बुधवारी राजेंद्र जगताप, माया बारणे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. राष्ट्रवादीकडून अनेक जण इच्छुक आहेत अशी स्थिती आहे. तर, भाजपाकडून सध्या तरी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला असल्याने शहरात त्याच अधिकृत उमेदवार असल्याची जोरदार चर्चा झाली आहे.