‘आम्हाला परंपरा शिकवू नये’, मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचा टोला
मुंबई : सध्या राज्यात पुण्यातील दोन पोटनिवडणुकांची (Maharashtra Politics) चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. यातच सर्व राजकीय पक्षांनी दोन्ही जागांसाठी तयारी सुरू केली. दोन्ही जागांची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तर, महाविकास आघाडी सरकार मात्र दोन्ही जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिंचवडची (Chinchwad By-Election) जागा आहे, ती शिवसेनेनं लढावी, असं मत स्पष्ट केले आहे. तर, पुण्यातील कसबा पेठेच्या जागेविषयी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घ्यावेत, आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवावी, असं आवाहन केले आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी कायम पायमल्ली होत आहे, हे कोणी शिकवू नये, नांदेड आणि पंढरपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणं होती, असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, परंपरा आहे, अंधेरी पोटनिवडणूक देखील बिनविरोध झाली नाही. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही. पण, नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या. या दोन्ही ठिकाणी आमदारांच्या जवळच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद होता. अंधेरीची निवडणूक मुंबईत होती आणि भाजपला जिंकण्याची संधी नव्हती. काल रात्री दोन्ही पोटनिवडणुकींसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर बैठक करण्यात आली. यासंदर्भात उद्या परत बैठक घेत काय निर्णय घ्यायचा याची चर्चा करणार आहोत. मात्र निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा आहे, ती शिवसेनेनं लढावी, असं आमचं मत आहे. पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय होईल. पण चिंचवडची जागा शिवसेनेनं लढावी, अशी चर्चा झाली यासंदर्भातला निर्णय होणार, असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.