अखेर ठरलं! कल्याण शिंदेंचचं, फडणवीसांनीच जाहीर केलं श्रीकांत शिंदेंचं नाव
Devendra Fadnavis on Shrikant Shinde : महायुतीत कल्याण लोकसभा मतदारसंघावरून मोठा पेच निर्माण झाला होता. या मतदारसंघात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहे. परंतु, शिंदेंना त्यांचीच उमेदवारी जाहीर करता आली नाही म्हणून विरोधकांकडून खिजवले जात होते. तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, या चर्चांना बाजूला सारत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कल्याण मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानिमित्त नागपुरात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले.
फडणवीस म्हणाले, श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून कोणताही विरोध नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्यांना जास्त मतांनी निवडून आणू. भाजप, राष्ट्रवादी, आरपीआ, रासपा युती श्रीकांत शिंदेंना निवडून आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
याआधी शिंदे गटाने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव नव्हतं. पहिल्या यादीत त्यांचं नाव नाही म्हटल्यावर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्री असतानाही भाजपाच्या दबावापुढे त्यांना मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही अशी खोचक टीका ठाकरे गटाकडून केली जात होती. तर दुसरीकडे भाजपानेही कल्याण आणि ठाणे मतदारसंघावर दावा केल्याचे सांगितले जात होते. या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ द्या त्या बदल्यात रत्नागिरी घ्या, अशी अट भाजपाने टाकल्याच्याही बातम्या आल्या होत्या.
त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी तिकीट मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या सगळ्या चर्चाच असल्याचे फडणवीस यांच्या विधानावरुन आज स्पष्ट झाले. आम्ही श्रीकांत शिंदे यांना निवडून आणू असेही फडणवीस यांनी स्पष्ट केली. त्यांच्या या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणखी एका खासदाराचं तिकीट पक्कं झाल्याचा मेसेज महायुतीच्या कार्यकर्त्यांत गेला आहे.