Vaishali Darekar : राज ठाकरेंनी घडवले, श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेत आणले… आता कल्याणमधून ठाकरेंच्या उमेदवार

Vaishali Darekar : राज ठाकरेंनी घडवले, श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेत आणले… आता कल्याणमधून ठाकरेंच्या उमेदवार

7 मार्च 2016 ची दुपार… शिवसेनेचे तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या मातोश्रीवर बंगल्यावर एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. त्यासाठी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे सर्वजण उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष सुरु होता. ठाकरे आले आणि ज्यांचा पक्षप्रवेश पार पडणार होता, त्या वैशाली दरेकर आणि अन्य महिलांना पुढे बोलावले. चाळीशीच्या वयातील दरेकर यांना पाहुन ठाकरे म्हणाले, “वैशाली ताई शिवसेनेत पुन्हा एकदा स्वागत आहे… जोमाने भगव्याचे काम करा…”

कट टू.. 2024.

आज बरोबर आठ वर्षांनंतर याच उद्धव ठाकरेंनी त्याच दरेकरांना कल्याण मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha Constituency) लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ज्या श्रीकांत शिंदेंनी दरेकरांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता, त्याच दरेकर आता श्रीकांत शिंदेंना आव्हान देणार आहेत. शिवसेनेत मागील दोन-अडीच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरोधात कोण उमेदवार असणार याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आदित्य ठाकरे, केदार दिघे, सुषमा अंधारे अशी एका पेक्षा एक सरस नावे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत होती. पण या सगळ्याच नावांना मागे सारत ठाकरेंनी अनपेक्षित डाव खेळला आहे. या डावाचा विचार कदाचित शिंदेंनीही केला नसावा… त्यामुळेच ठाकरेंच्या या खेळीची अवघ्या महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) candidate for Vaishali Darekar from Kalyan Lok Sabha Constituency)

त्याच पार्श्वभूमीवर पाहुया नेमक्या कोण आहेत वैशाली दरेकर….

वैशाली दरेकर यांचे नाव महाराष्ट्राला नवीन असले तरीही कल्याण-डोंबिवलीमध्ये त्यांचे नाव नवीन नाही. दरेकर या मुळच्या शिवसैनिकच. राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक या पट्ट्यात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, नगरसेवक, आमदार तयार केले. त्यातीलच एक म्हणजे वैशाली दरेकर. शिवसेनेतून त्या नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या. पुढे राज ठाकरेंनी मनसे सोडल्यानंतर दरेकर यांनीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये दरेकर यांनी मनसेकडूनच कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आनंद परांजपे होते.

त्या निवडणुकीत परांजपे यांना दोन लाख 14 हजार 476 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या वसंत डावखरे यांना एक लाख 88 हजार 267 मते मिळाली होती. तर दरेकर यांना एक लाख दोन हजार 63 मते मिळाली होती. दरेकर यांना एक लाख 12 हजार मतांनी पराभव झाला होता. पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मते घेतल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. मनसेचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यानंतर 2010 च्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत त्या पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यावेळी राज ठाकरेंनी देरकरांवर विरोधी पक्षनेते जबाबदारी सोपविली.

विरोधी पक्षनेता असताना दरेकर यांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले होते. मात्र 2015 मध्ये झालेल्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग आरक्षण आणि पुनरर्चनेमुळे उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तना न झाल्याने त्या नाराज होत्या. हीच नाराजी हेरली श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंनी. त्यानंतर 7 मार्च 2016 रोजी दरेकर यांचा महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.

मध्यंतरी झालेल्या बंडानंतरही दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंसोबत न जाता ठाकरेंसोबतच राहणे पसंत केले. दरेकर या सध्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक पदावर कार्यरत आहेत. शिवसेनेते सामान्य व्यक्तींना पदे दिली जातात, आमदार, खासदार केले जाते, असे म्हणत ठाकरे यांनी आज त्यांची उमेदवारी जाहीर केली. ठाकरे यांनी हे वाक्य म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात एका सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली असल्याचा संदेश दिला आहे. आता या व्हीआयपी सीटवरुन दरेकर श्रीकांत शिंदे यांना कसे आव्हान देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज