Maharashtra Politics : शिंदेंनंतर फडणवीसांची विकेट? अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीने वाढली धुसफूस !
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून धुसफूस वाढल्याच्याही बातम्या येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता अजित पवार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खात्यात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. अजित पवार यांनी सोमवारी फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याची महत्वाची बैठक घेतली.
या बैठकीवरून राज्याच्या महायुतीच्या नेत्यांकडून नाराजीचा सूर दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेऊन ऊर्जा खात्याची बैठक घेतल्याने भाजप नेत्यांत नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी सोमवारी महावितरणशी संबंधित प्रलंबित आणि नवीन कामांचा आढावा घेतला. या बैठकीत माढा, करमाळा, नगर, अकोले, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती या तालुक्यांतील कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांमधील ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसंच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा आज आयोजित बैठकीत घेतला. राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी… pic.twitter.com/KBxVQ4b0Z1
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 11, 2023
अशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही खात्यात हस्तक्षेप होऊ लागल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या बैठकीमुळे भाजपसह शिंदे गटातील नेतेही नाराज झाले आहेत. याआधी अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत अनेक योजनांचा आढावा त्यांनी घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर खुद्द अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला होता. यानंतर आता फडणवीसांच्या अखत्यारित खात्यांसंदर्भात अजितदादांनी बैठका घेतल्याने फडणवीस यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे. या नव्या घडामोडीमुळे अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर फडणवीस यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दादा विरुद्ध दादा! अजित पवार-चंद्रकांत पाटील वादात अडकली पुण्यातील 400 कोटींची कामे
पुण्यात दादा विरुद्ध दादा वाद वाढला
शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप अजित पवार यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यात बैठकांचा धडाका सुरु केला आहे. अजित पवारांच्या या धडाक्यामुळे पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्रिपद जरी आपल्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पवार यांच्या या बैठकांमुळे चंद्रकांतदादांसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच कोंडी झाली आहे.