जयंत पाटलांचं एकाच वाक्यात ट्विट पण, ‘ते’ ठासून का सांगितलं ?
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या निवड समितीने अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा एकमताने फेटाळला. तसेच त्यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत राजीनामा फेटाळल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.
आम्ही सर्व साहेबांसोबत… pic.twitter.com/LNwvRD7SuU
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 5, 2023
जयंत पाटील यांनी फक्त एकाच वाक्यात ‘आम्ही सर्व साहेबांसोबत.. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. जयंत पाटील यांनी विशेषपणे हे ट्विट का करावेसे वाटले, याचे आता अर्थ लावले जात आहेत.
जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत, असे सांगत आहेत. याचा अर्थ राष्ट्रवादीतील इतर कोणी नेते हे पवार यांच्या विरोधात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. पवारांची राजीनाम्याची घोषणा झाली तेव्हा जयंत पाटील यांच्यासह काही नेते भावनाविवश झाले होते. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासारखा नेता हा राजीनामा स्वीकारा या भूमिकेचे उघडपणे ठाम समर्थन करत होता. पवारांच्या राजीनाम्यावरून सुरू केलेली रडारड थांबवा, असे जाहीरपणे अजितदादा सुनावत होते. या प्रसंगाची किनार जयंत पाटील यांच्या ट्विटमागे आहे का, अशीही शंका घेतली जात आहे.
कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? ; पाहा, कुणाच्या नावाला मिळाली सर्वाधिक पसंती
राष्ट्रवादीच्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतप प्रफुल्ल पटेल यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांनी या समितीच्या निर्णयाचे समर्थन केले. पण त्याच वेळी अजित पवार हे कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त न करता निघून गेले. त्यांच्या या कृतीचे आणि जयंत पाटील यांचे आम्ही साहेबांसोबत आहोत, हे ठासून सांगण्याच्या ट्टिटचे पडसाद आगामी काळात दिसणार का, यावर आता लक्ष लागले आहे.
पवारांचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून जयंत पाटील यांचे समर्थक मानले जाणारे मेहबूब शेख यांच्यासारखे कार्यकर्ते हे पहिल्या दिवशी आक्रमक होते. पण त्यांना अजितदादा हे पवारांसमोरच जाहीरपणे झापत होते. त्या प्रसंगाचेही अनेक अर्थ लावले गेले. त्यात जयंत पाटील यांनीच स्वतंत्रपणे यांचे हे स्वतंत्र टि्वट हाच प्रसंग पुढे नेणारा असावा, असेही बोलले जात आहे.