मी गंगा भागिरथी नाही, ते नावही वापरणार नाही; यशोमती ठाकूर कडाडल्या..
Yashomati Thakur : राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील विधवा महिलांना गंगा भागिरथी शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या या प्रस्तावावर राज्यभरात प्रचंड गदारोळ उठला. विरोधकांनी टीकेची झोड उठविली तर खुद्द सत्ताधारी गटातही मतभेत असल्याचे दिसून आले. आता माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला परखड शब्दांत सुनावले आहे.
‘होय, मी गंगा-भागिरथी नाही, मी कधीही माझ्या नावासमोर तसा उल्लेख करणार नाही. हा असला काही निर्णय या राज्यात आम्ही होऊ देणार नाही. मी माझ्या पतीला गमावलं. त्यांच्या अचानक निधनानंतर मी माझ्या दोन मुलांना सांभाळलं, मोठं केलं. मला या देशातील संविधानामुळे समानतेचा, शिक्षणाचा अधिकार मिळाला.’
मंत्री मंगलप्रभात लोढा एक कलंक; कॉंग्रेसचा हल्लाबोल
‘मी आज एक स्वतंत्र माणूस म्हणून जगतेय. गुलामगिरीच्या जोखडातून समस्त दलित-शोषित-वंचित आणि महिला मुक्त झाल्या. मात्र तरीही ही जोखडं पुन्हा या सर्व वर्गाच्या गळ्यात बांधायचा डाव मनुवादी लोकं सातत्याने करत असतात. हा घातक डाव आहे’, अशा शब्दांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘विधवा महिलांना अनेक कुचंबणा सहन कराव्या लागतात. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करत असताना त्यांना नवनवीन विशेषणे देऊन काही फरक पडणार नाही. या महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीत आधिक सुसूत्रता आणण्यासाठी काम केले पाहिजे. अशा चर्चा सुरू करून सरकार महागाई, अदानी, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नांपासून पळण्याचा प्रयत्न करत आहे’, अशी टीका त्यांनी केली.
संभाजीनगरमधील दंगल पूर्वनियोजित होती, असं म्हणणाऱ्यांनी काय केलं? दानवेंचा फडणवीसांना सवाल
दरम्यान, विधवा महिलांना गंगा भागिरथी म्हणण्याचा प्रस्ताव सरकारने दिला होता. मात्र, यावर जोरदार वाद झाला. त्यानंतर मंत्री लोढा यांनी स्पष्टीकरण देत तसा काही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले होते. या प्रस्तावाला वाढता विरोध पाहता आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.