Nana Patole : महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांसह सुधाकर अडबालेंना पाठिंबा
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale)यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं की, नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार आहे. पटोले म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना(Shivsena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या नेत्यांनी एकत्रित चर्चा करून नाशिक व नागपूर मतदार संघाबाबत निर्णय घेतलेला आहे.
पटोले यांनी सांगितलं की, राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआचा पाठिंबा आहे. विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लींगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील असतील. विधान परिषदेच्या या पाचही जागांवर महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्ते एकदिलानं काम करून या पाचही जागा विजयी करतील, असंही त्यांनी सांगितलंय.
नाशिकमध्ये भाजपला उमेदवारही मिळाला नाही. भाजप हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.