वाल्मिक कराडने सगळे पापं मुंडेंसाठी केले, त्यांची आमदारकीही रद्द करा, जरांगेंची मागणी

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सर्वच जण हादरले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं. दरम्यान, धनंजय मुंडेंनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांना आमदारकीपासून दूर ठेवा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती
तसेच धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा बळी दिल्याचा आरोपही जरांगेंनी केला.
मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पण आता त्यांची आमदारकीही काढून घ्यावी. त्यांच्या चार-पाच चौकशी होण्याची गरज आहे. त्यांचे कार्यालय या प्रकरणातील 1 नंबरचा आरोपी (वाल्मिक कराड) चालवत होता का? त्याचा तपास सीआयडीने करावा. ते मंत्री असताना हा एक नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत होता का? याचीही चौकशी झाली पाहिजे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्यावतीने तोच करून देत होता का, याचीही सीआयडी आणि एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असं जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडेंनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला
पुढं ते म्हणाले की, संतोष देशमुखांचा खून झाला तेव्हा या प्रकरणातील आरोपींनी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधला होता का? तर केला होता. १०० टक्के केला होता. त्याची चौकशी करा. संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी ५-६ दिवस अगोदर ते राजीनामा देईपर्यंतचा मुंडेंचा संपूर्ण सीडीआर काढला पाहिजे. त्यांनी आरोपीला १०० टक्के वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे ते ३०२ अंतर्गत सह-आरोपी ठरतात, असंही जरांगे म्हणाले.
मुंडेंची आमदारकी रद्द करा…
मुंडेंनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आमदारकीही रद्द करण्यात यावी. तसेच धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा बळी दिल्याचा आरोपही जरांगेंनी केला.
मुंडेंनी कराडचा बळी घेतला…
वाल्मिक कराड सारख्या माणसाकडे एवढे वैभव कसे आले? हे वैभव त्याचे स्वत:चे नाही तर धनंजय मुंडेंचे आहे. कराडने सगळे पापं मुंडेंसाठी केले. पण आज मुंडे हे पाप वाटून घेण्यास तयार नाहीत. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कराडचा बळी दिला. त्याला वापरून फेकून दिले, यामुळे मुंडेंचा स्वार्थीपणा त्यांच्या समाजाला कळला. असं ते म्हणालेत.