जरांगेंच्या गंभीर आरोपावर मंत्री देसाई म्हणतात; जरांगेंचा काहीतरी गैरसमज झाला असावा…
मुंबई : छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे कशामुळे बोलतात माहित आहे का? यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले असा अंदाज आहे की, तुम्ही मराठ्यांना उचकावा म्हणजे मराठे रागीट आहेत, ते काही तरी करतील आणि त्या नावाखाली आपण मराठ्यांना आरक्षण देणार नाही असा डाव आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) केला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. मंत्री शंभुराज देसाई (Shamburaj Desai) यांनीही यावर भूमिका जाहीर केली आहे. मनोज जरांगेंचा काही तरी गैरसमज झाला असावा, असे देसाई यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil : ‘….तीच भाषा जरांगेंच्या तोंडी’; भाजप नेत्याचा शरद पवारांकडे रोख?
शंभुराज देसाई म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबत शब्द दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा जरांगेंचे म्हणणे गैरसमजातून झाले असावे. मनोज जरांगे हे उपोषणाला बसल्यापासून मंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत. जरांगेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. तसेच जरांगे यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे.
मनोज जरांगेंचं केवळ शक्तिप्रदर्शन, ठोस निर्णय नाहीच! पुन्हा जुन्याच मागण्यांचा सूर
कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मराठा समाजाला आपल्याला द्यायचे आहे. जरांगे यांनी दहा दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. पण घाई, गडबडीत निर्णय घेतल्यास अडचणी निर्माण होतील, असा धोका असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार शांत बसलेले नाही. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका होत आहे. आरक्षण देण्यासाठी आयोग गठीत केलेला आहे. सरकार युद्ध पातळीवर यासाठी काम करत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
गुणरत्न सदावर्तेंना देसाईंनी झापले
मनोज जरांगे यांना शरद पवार हे मदत करत असल्याचा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्याला देसाई यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. पुरावा असल्याशिवाय असे आरोप करू नये. त्याची पुष्टी देणारा, ठोस पुरावा असेल तर तो माध्यमांसमोर मांडावा. उगाच कोणाचे तरी नाव घेऊन रसद पुरवत असल्याचे मोघम उत्तरे देऊ नये, असेही देसाईंनी म्हटले आहे.