Nana Patole : थोरातांच्या राजीनाम्याला सहा दिवस तरीही, नाना पटोलेंचे एकच वाक्य..

Nana Patole : थोरातांच्या राजीनाम्याला सहा दिवस तरीही, नाना पटोलेंचे एकच वाक्य..

मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला. आ. थोरात यांनी पटोले यांच्यावर आरोप करत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले. ‘बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहित नाही त्यामुळे मी उत्तर कसे देऊ,’ असे ते म्हणाले. पटोले मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की ‘मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी (PM Modi Mumbai Visit) कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अदानींसंदर्भात (Gautam Adani) काही प्रश्न विचारले होते. पण त्यावर मोदी संसदेत एक शब्दही बोलले नाहीत. मुंबईच्या भाषणात तरी ते त्यावर काही बोलतील असे वाटले होते पण ते बोलले नाही. मोदी म्हणतात, त्यांच्यासोबत देशातील १४० कोटी लोक आहेत मग एलआयसी व एसबीआयमध्ये या १४० कोटी जनतेमधीलच लोकांचे पैसे आहेत, तो पैसा सुरक्षित आहे का, यावर त्यांनी बोलायला पाहिजे होते. पण, मोदींनी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही यातून ते अदानीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झाले,’ असा आरोप पटोले यांनी केला.

‘पंतप्रधान मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणे अपेक्षित होते परंतु त्यांनी पुन्हा मुंबई व महाराष्ट्राची घोर निराशाच केली.’

‘पंतप्रधान मुंबईत येतात याचा आनंदच आहे पण त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नाची जाणीव नाही. जानेवारीत ते आले पण मुंबई व महाराष्ट्रातील प्रश्नांवर काहीही बोलले नाहीत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर समस्या आहे त्यावर ते बोलत नाहीत. आजही या विषयावर ते गप्प होते. २०१४ आधी मात्र नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘चाय पे चर्चा’ करत होते. आता ते केवळ ‘मन की बात’ करतात, जनतेची ‘मन की बात’ करायला पाहिजे. मागच्या महिन्यात मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपाची दमछाक झाली. फेरीवाल्यांना आमिष दाखवून सभेला बसवावे लागले. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी जनतेने त्यांचा निर्णय पक्का केला आहे. भाजपने महाराष्ट्रासह देशाच्या जनतेला फसवले आहे म्हणूनच भाजपाला मतदान करायचे नाही अशी मानसिकताच जनतेने बनवलेली आहे.’

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube