Nana Patole : ‘मविआ राहिली नाही तर आमचा पालन तयार’
Nana Patole On Maha Vikas Aghadi : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad Pawar) यांनी मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं वक्तव्य करत मोठी खळबळ उडवून दिली. 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही? हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं मविआच्या आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यावरून साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याची माहीती आहे. आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला सीएम पद देण्याचा प्रस्ताव त्यांनी राष्ट्रवादीला दिल्याची माहिती आहे. यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं वक्तव्य केलं. मविआत ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं पटोलेंनी सांगितलं.
पटोले यांना विचारण्यात आलं होतं की, राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य आणि राज्यातील एकूण चर्चा पाहिली तर अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नांवर बोलतांना ते म्हणााले की, या प्रश्नांशी कॉंग्रेसचं काही देणं घेणं नाही, कारण आम्हाला महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. महाविकास आघाडी मजबूत असून आम्ही एकत्र आहोत. महाविकास आघाडीत फुट पडली किंवा आम्ही एकत्र राहिलो नाही, तर कॉंग्रेसचा प्लॅन तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Operation Kaveri : 24 तासांत 561 भारतीय सुदानहून रवाना, तीन हजारपेक्षा जास्त लोक अडकले
अजित पवार यांच्या भाजपच्या कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, असं सांगितलं होतं. या विषयी पटोलेंना विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळं आत्ताच त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा ज्या महाविकास आघाडीतील ज्या पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं पटोलेंनी सांगितलं.
पटोले यांनी यावेळी बोलतांना शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्त्र डागलं. महाराष्ट्रातील सरकार हे असंवैधानिक आहे. हे सरकार ईडीचे सरकार आहे. राज्यात जनतेचे प्रश्न वाढले आहेत. आज राज्यातील शेतकरी, तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे महागाईही मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे मात्र, याची दखल सरकार घेत नसून सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. मुख्यमंत्री संपावर गेलेत की सुट्टीवर असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे असा घणाघात पटोलेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे.
पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे. मविआतील तीनही पक्ष भापजला चिटपट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अजित पवार भाजपात जाणार ह्या चर्चेमुळे आणि शरद पवारांच्या 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही? हे आत्ताच कसं सांगणार? आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे. पण, फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते, असं वक्तव्य केल्यानं मविआच्या आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यावरून साशंकता निर्माण झाली. त्यामुळं आता महाविकास आघाडी टिकावी याासठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला. त्यांनी आगामी काळात मविआची सत्ता आल्यास NCP ला सीएम पद देण्याची तयारी दर्शवत तसा प्रस्तावच त्यांनी राष्ट्रवादीला दिला. त्यानंतर आता पटोलेंनी यावर भाष्य करत जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा महाविकास आघाडीतील ज्या पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य केलं. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी-शिवसेनाकडून काय उत्तर येतं हेचं पाहणं महत्वाचं आहे.