नारायण राणेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा; बाळासाहेबांच्या आठवणीत राणे भावूक
Narayan Rane told story of Balasaheb : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्यातून विस्तवही जात नाही, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. नारायण राणे हे उध्दव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरेंवर राणेंनी कधीच टीका केली नाही. शिवसेना सोडल्यानंतरही त्यांनी बाळासाहेंबांवर कधी टीकास्त्र डागलं नाही. ते कायम बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आदरच करत राहिले. अनेकदा राणेंनी मी जो काही आहे, तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच आहे, असं जाहीरपणे सांगितलं. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलतांना राणेंनी बाळासाहेबंची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. ते एक वेगळंच व्यक्तीमत्व होतं, त्यांची आजही आठवण आली की मी भावूक होतो, असं म्हणत बाळासाहेबांनी आपल्याला कसं घडवलं, याचा एक किस्सा सांगितला.
मुंबई तकच्या मुलाखतीत बोलतांना राणे म्हणाले की, बाळासाहेबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, ते एक वेगळंच व्यक्तीमत्व होते. त्यांचे आजार, विचार, निर्धार हा निराळा होता. त्यांनाच मी माझं राजकीय गुरू मानतो. त्यांची आजही आठवण आली की, मी भावूक होतो. त्यांनी मला राजकारणात घडवलं. त्यामुळं ते माझ्यासाठी फक्त शिवसेनाप्रमुख नव्हते. माझे दैवत होते. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. पूर्वी मी फार स्पीडने बोलायचो. एका दिवशी बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं. आणि विचारलं की, कुठं होतास? कुठून आलास? तर मी सांगितलं की, दौऱ्यावर होता. मग त्यांनी विचारलं की, सभा कशी झाली? अन् ते म्हणाले की, किती फास्ट बोलतोस? त्यावर मी विचारलं की, तुम्हाला कसं कळलं? त्यावर त्यांनी सांगितलं की, अरे तुझी कॅसेट ऐकली मी… सावकाश बोल… एकतरी कोपरखळी मार. श्रोत्यांनी तू किती गंभीर ठेवतोस, त्यांना थोडं हसवं. आणि तू भाषण करू नको, तू लोकांशी बोलतो आहेस, असं त्यांना वाटू दे… आपण कसं असावं? लोकप्रतिनिधी म्हणजे काय? सरकारमध्ये असतांना आपण कसं वागलं पाहिजे, हे सगळं त्यांनी शिकवलं.
दादा भुसेंच्या वाहनाला कट मारणं भोवले, भुसेंनी पाठलाग करत अवैध गोवंश वाहतूक पकडली
राणे म्हणाले की, मी घराबाहेर पडतांना मला कधी घरच्यांनी विचारलं नाही, की कुठं चालला आहेस? जेवला आहेस का? पण, दौऱ्यावर जातांना बाळासाहेबांना भेटून जायचो. तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. कुठं चालला? मी म्हणायचो, कोकणात चालला आहे. संध्याकाळी जाईन, सकाळी पोहोचेल. मग ते विचारयचे, ड्रायव्हर कोण आहे? ते ड्रायव्हरला बोलावून घ्यायचे….. त्याची चौकशी करायचे. झोपला होता का? जेवला आहेस का? साहेबांना व्यवस्थित घेऊन जा, असे प्रश्न विचारायचे. एवढं कोण करतं? हे फक्त साहेबच करू शकतात. साहेब साहेब आहेत, बाकी इतर कोणी नाही, अशी बाळासाहेबांची आठवण राणेंनी सांगितली.
यापूर्वी अनेकदा राणे बाळासाहेबांच्या आठवणीत भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. मी जो कोणी आहे, तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच. त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, तो कोणताच नेता टाकणार नाही. कोणत्याही पक्षात गेलो तरी बाळासाहेबांचं स्थान अढळ आहे, असं राणेंनी सांगितलं. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांविषयी बोलतांना कृतज्ञता व्यक्त करून शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झाले होते. बाळासाहेब असते, तर नक्कीच मातोश्रीवर जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले असते, असं राणे तेव्हा म्हणाले होते.