मी बेकायदेशीर तर माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आमदारही…; जयंत पाटलांचे मोठं विधान

मी बेकायदेशीर तर माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आमदारही…; जयंत पाटलांचे मोठं विधान

Jayant Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा ठोकला. याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिल्यांदा सुनावणी झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. शिवाय, शरद पवार हे मर्जाीनुसार पक्ष चालवतात, जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. यावर आता खुद्द जयंत पाटील (Jayant Patil) यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठा होणार खंडीत, कारण… 

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी केला. तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. याविषयी जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, माझी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उदमेवारांना माझ्या स्वाक्षरीनेच एबी फॉर्म देण्यात आले होते. जर मी बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदार देखील बेकायदेशीर ठरणार का, असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले, मी निवडणुकीने निवडून आलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र दिलं होतं. आमचे वकील संख्याबळाबाबत युक्तिवाद करतील. पहिल्यांदा जेव्हा ही घटना घडली, तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. मात्र यानंतर अजित पवार गटाने कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते, हे विचारात घेऊन निर्णय द्यावा, असं पाटील म्हणाले.

तुम्ही शरद पवार यांच्यासोबत पंचवीस वर्षे काम केले. पंचवीस वर्षांनंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे की, इतक्या उशिरा का लक्षात आले? असा सवाल जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला केला.

चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच नाही
शरद पवार हे संस्थापक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला आजवर कोणी आव्हान दिलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिले होते. हात उंचावून, त्याचे क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठवण्याची एक पध्दत आहे. पण, आमच्या वकिलांनी सांगितले की, चिन्ह गोठवू नका. मुळात चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच नाही, कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवारांचे आहेत. उद्या कुणी भाजपच्या निवडणूक चिन्हावर प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठवणार का? असा सवाल त्यांनी केला.

घरातून वडिलांना काढत नाही
शरद पवारांच्या कार्यशैलीतून हे लोक मोठे झाले आहेत. तिच लोक आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत. घरातला लहान मुलगा जेव्हा मोठा होतो, आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं तेव्हा तो स्वत:चं घर बांधतो, तो घरातून वडिलांना काढत नाही. यातच सगळं आलं, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube