दिल्लीतून येतानाच ठरवलं होतं सरकार बुडवायचं; छगन भुजबळांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal On Prithviraj Chauhan : राष्ट्रवादीच्या (NCP) रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईमधील (Mumbai) षण्मुखानंद सभागृहात (Shanmukhananda Auditorium)कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरुवातीच्या काळावर प्रकाश टाकला त्यावेळी नेमकी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना कशी झाली? राष्ट्रवादीला आपलं पक्षाचं चिन्ह कसं मिळालं, याच्याबद्दल माहिती सांगितली. (ncp-mumbai-chagan-bhujbal-criticize-prithviraj-chauhan)
जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला “ सुप्रिया सुळे असं का? म्हणाल्या…
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, 17 मे 1999 या दिवशी शरद पवार आणि त्यांचे दोन सहकारी तारिक अन्वर आणि संगमा यांना कॉंग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. मतभेद होतात, पण ते चर्चेने सोडवायला हवेत. पण अचानक बाहेर काढलं. मी तेव्हा विधानपरिषदेमध्ये कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाने शरद पवारांचा पुतळा जाळण्याचं ठरवलं, ही बातमी समजल्यानंतर त्यावेळी मला आठवतं त्यावेळी माजगावच्या त्या सुनीताताई शिंदे, अलकाताई पेंटर, शिवाजीराव नलावडे हे त्या ठिकाणी घुसले, पवार साहेबांचा पुतळा तुम्ही जाळता कामा नये म्हणून ते रक्ताबंबाळ होऊन ते आले, पण पुतळा त्यांना जाळू दिला नाही. मी बाहेरगावावरु आल्यानंतर मी सांगितलं की, मी पवार साहेबांबरोबर आहे.
बूथ कमिट्या बांधा त्याशिवाय रिझल्ट मिळणार नाही; जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना खास मंत्र
कॉंग्रेसने अनेक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेत्यांचे फोन आले, सांगितलं पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच त्यावर मी सांगितलं की, मुख्यमंत्री ते पुढे पाहू पण आमचे 54 टक्के ओबीसींना आरक्षण हे शरद पवार यांनी दिलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देताना सरकार गेलं तरी बेहत्तर पण विश्वविख्यात डॉ. बाबासाहेबांचं नाव विद्यापिठाला द्यायचंच हा पण शरद पवार साहेबांनी पूर्ण केला. त्यामुळे मी विचार केला की, कशाला इकडं तिकडं जायचंय.
चाल उनकी चल सकते है क्या आप; शायराना अंदाजात भुजबळांनी गाजवलं ‘षण्मुखानंद’
स्वस्थ बसणं शक्य नव्हतंच, सगळेजण एकत्र आले आणि ठरवलं आपण वेगळा पक्ष काढायचा. नाव काय ठेवायचं, नावही ठरलं. त्यावेळी आमच्याकडे बाकीच्या काही वास्तु नव्हत्या. फक्त मंत्रालयासमोरचा ए10 जो विरोधी पक्षनेत्याचा म्हणजे माझा बंगला होता, तेच राष्ट्रवादीचं कार्यालय झालं. नाव ठरलं, रजिस्ट्रेशन करायचंय त्यासाठी एक हजार मतदारांचं अॅफेडव्हीट पाहिजे होतं की आम्ही अमुकअमुक पक्षाचा राजीनामा देतोय आणि या पक्षाला पाठिंबा देतोय. माजगावच्या एक हजार कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस घरोघर जाऊन ते अॅफिडेवीट गोळा केली. सुरुवातीला चरखा हेच चिन्ह ठरवलं पण नेमकं ते दिल्लीमध्ये अडकलं, चरखा कोणालाच नाही असं ठरलं. मग मनगटी घड्याळ पाठवलं, ते जमणार नाही असं सांगण्यात आलं मग त्याच घड्याळाला दोन पाय लावले मग ते चिन्ह झालं झेंडा झाला.
शिवाजी पार्कच्या कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी सांगितलं की, आम्ही शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचाराने पुढे जाणार आहोत. लाखो लोक होते. पक्ष तयार झाले. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब झाले आणि प्रांतिय अध्यक्ष छगन भुजबळ झाले. कामाला सुरुवात झाली. अजून जिल्ह्या-जिल्ह्याचे अध्यक्षही नेमून झाले नव्हते, सहा महिने अगोदरच लोकसभेबरोबरच इंडिया शायनिंग लोकसभेसोबतच विधानसभेच्या जाहीर केल्या.
ते सहा महिने मिळाले असते तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, त्यावेळी पंधरा-पंधरा वीस वीस सभा घेत होतो. त्यावेळी पाच-सहा आमदार कमी पडले आणि आमच्यापुढे कॉंग्रेस आलं. अचानक चित्र बदललं. एकाकी लढलो आणि थोडक्यात आम्ही कमी पडलो. कॉंग्रेससोबत समझोता झाला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो.
पंधरा वर्षे चांगले निर्णय झाले. आणि शेवटच्या सुद्धा पंचवार्षिकमध्ये जर राज्याला योग्य नेतृत्व लाभलं असतं तर तुम्हाला सांगतो आजही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचंच सरकार कायम या राज्यात राहिलं असतं. पण कॉंग्रेसचे मुख्यमंत्री जे आहेत, ते कॉंग्रेसने पाठवले आणि काय सांगायचं? जणू ठरवूनच आले होते की, राज्यातलं सरकार बुडवायचंच आणि बुडवलं, असं म्हणत तत्कालीन कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.