राजीनामा सत्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांचाही राजीनामा
Sharad Pawar retirement : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा (Jitendra Awad resigns) दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील (Anil Patil resigns) यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.
धारशिव आणि बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी कालच राजीनामे पाठवले होते. मात्र हे राजीनामे स्वीकारणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र तरीही कार्यकर्त्यांची नाराजी काही केल्या कमी होताना दिसत नाही. आमदार आणि प्रतोद अनिल पाटील यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आमदारकीच्या राजीनाम्याचे पत्र दिले.
राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य तर भाजपकडून ऑफर, बावनकुळे म्हणाले…
आमदार अनिल पाटील म्हणाले की शरद पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आमचे राजकीय अस्तित्व त्यांच्यामुळे आहे. माझ्यासह इतर आमदारांनी राजीनामा दिला आहे. प्रतिकात्मकरित्या मी राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत ठाण्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या राजीनाम्याची पत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठवली आहेत.