विधानसभेत यायला 25-25 वर्षे संघर्ष करावा लागतो – देवेंद्र फडणवीस
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (सीपीए) च्या संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन आज सकाळी विधान परिषद सभागृहात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ‘आपण लोक फार भाग्यवान आहात. कारण या सभागृहात येण्यासाठी अनेकांना 25-25 वर्षे संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाविना या सभागृहात येऊन बसण्याची संधी मिळाली म्हणून आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.’
त्याचबरोबर त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संसदीय लोकशाहीची रचना इतकी सुंदर केली आहे की ही सभागृहे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या आशाआकांक्षा आणि अपेक्षांची प्रतिबिंबे आहेत. आपल्या लोकशाहीमध्ये आपण ‘सेपरेशन ऑफ पावर’ मान्य केले आहे. ते मान्य करत असतानाच ‘चेक अँड बॅलन्स’ ठेवला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील आम्ही सगळे सहकारी हे ‘एक्झिक्यूटिव्ह’ आहोत. आम्ही जबाबदार असून विधिमंडळाला उत्तरदायी आहोत.
अनेकदा लोकांना असे वाटते की सभागृहात गोंधळ होतो. नक्कीच होतो पण गोंधळ कमी काळ होतो. पण दाखवला अधिक जातो. त्यामुळे सभागृह बंद पडले याची न्यूज व्हॅल्यू जास्त आहे आणि सभागृहाने चौदा तास काम केले याची न्यूज व्हॅल्यू कमी आहे. मी दोन्ही सभागृहांमध्ये पाहतो की गोंधळ होतो, सभागृह बंद पडते तरी नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ काम होते. अनेकदा रात्री बारा-बारा वाजेपर्यंत काम चालते. पुन्हा सकाळी 9 वाजता काम चालू होते. खूप चर्चा त्या ठिकाणी होतात.
या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. मला अतिशय आनंद आहे, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून प्रगल्भ लोकशाही आणि त्या लोकशाहीला समजणारे प्रगल्भ नागरीक हे आपण तयार करतो. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही लोकशाहीची मंदिरे कशी चालतात हे लोकांपर्यंत देखील पोहोचेल. त्यातून लोकशाहीवरचा जनसामान्यांचा विश्वास वाढेल.
या कर्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री आमदार चंद्रकांत पाटील, ‘सीपीए’चे खजिनदार आमदार ॲड आशिष शेलार, मविसचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.