पक्षाची भूमिका न्यायाला…, निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंचं पहिलं ट्विट

पक्षाची भूमिका न्यायाला…, निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंचं पहिलं ट्विट

अहमदनगर : कॉंग्रेस पक्षाने माझ्याबाबत घेतलेली भूमिका न्यायाला धरुन नसून चौकशीअंती सत्य समोर येईलच, माझा न्यायावर विश्वास असल्याचं ट्विट सुधीर तांबे यांनी केलंय. दरम्यान, सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय.

आम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. आमची भूमिका आम्ही योग्यवेळी मांडणार आहोत. काय घडामोडी होतात? यापेक्षा निवडणूक महत्वाची आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत मी काही बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा आहेत, त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. संपूर्ण घडामोडींवर मी आणि माझा मुलगा येत्या 18 जानेवारीला आमची भूमिका स्पष्ट करणार असून पक्षाने माझ्याबाबत घेतलेली भूमिका ही न्यायाला धरुन नसून माझा न्यायावर विश्वास असल्याचं ते म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले सुधीर तांबे यांनी पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारत आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर ते आता कोणती भूमिका घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आपला मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांनी सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसच्यावतीने अर्ज दाखल केल्याचा दावा केला. मात्र, कॉंग्रेसच्या नेत्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला होता.

दरम्यान, सुधीर तांबे यांनी पक्षासोबत दगाफटका करुन फसवेगिरी केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. सत्यजित तांबे कॉंग्रेसचे उमेदवार नसल्याचंही ते म्हणाले होते. पक्षाच्या हायकमांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर पक्षाने त्यांच्यावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube