Politics : केसीआरच्या पक्षाला महाराष्ट्रात कोण देणार हात ? ‘या’ नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना आता धुमारे फुटले. त्यासाठी चंद्रशेखर राव याना महाराष्ट्रात नवे मित्र पाहिजेत. याकरिता त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केली. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. शिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचीही केसीआर यांच्याबरोबर भेट झाली. परंतु प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) येत्या १७ फेब्रुवारीला तेलगंणात केसीआर बरोबर एका सोहळ्यात राहणार आहेत. यामुळे केसीआर यांचा पक्षाचा महाराष्ट्रातला कोणाचा चेहरा कोण असणार ? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरु झालीय.
मुख्यमंत्री केसीआरच्या पक्षाला महाराष्ट्रातला नवा चेहरा कोणाचा ?
स्वाभिमानीचे राजू शेट्टी, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि वंचित बहूजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. केसीआर यांना महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी नेत्यांशी बोलणी सुरु केली. या ३ नेत्यांशिवाय आणखी काही नेत्यांबरोबर ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आमच्याबरोबर या अशी केसीआर यांनी राजू शेट्टींना विनंती केली आहे. तसेच संभाजी राजे याना देखील केसीआर यांची भेट झाली आहे. परंतु प्रकाश आंबेडकर तेलगंणा विधानसभेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली.
केसीआर यांच्या नांदेड सभेनंतर महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांत बीआरएसची वाहने फिरत आहेत. या सर्व वाहनांची सुरुवात शिवनेरी गडापासून केली जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. देशात ३० लोकसभा, ७० विधानसभा जागांवर तेलगू भाषिकांचा प्रभाव राहणार आहे, असे केसीआर यांना वाटत आहे. हा प्रभाव चाचपण्याची सुरूवात जवळ असल्याने महाराष्ट्रापासून झाली. म्हणून महाराष्ट्रातला त्यांचा नवा चेहरा कोण हे फार महत्वाचे ठरणार आहे.
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मागणीवर केसीआर यांची देशाला नवी ओळख मिळाली आहे. तेलंगणा स्वतंत्र झाले. गेल्या २ वर्षांत रावांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटलेत. तिसऱ्या आघाडीचा प्रमुख बनून थेट पंतप्रधान किंवा किंगमेकर बनण्याचा प्रयत्नात केसीआर यांचा असणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमाकांच्या महाराष्ट्रावर केसीआरची नजर राहणार आहे. त्याकरिता स्थानिक नेत्यांना ते ऑफर देत असल्याचे दिसून येत आहे.
‘या’ नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
राजू शेट्टी – पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात कांही भागात राजू शेट्टी यांचा प्रभाव आहे. केसीआर यांनी शेतकऱ्यांना अनेक योजना दिल्या आहेत. 2020-21 च्या शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या दिल्ली आणि पंजाबमधील शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्यांनी स्वतःला शेतकरी समर्थक नेता म्हणून सादर केले आहे.
छत्रपती संभाजी राजे – सर्वसमावेशक भूमिकेसाठी छत्रपती संभाजी राजे ओळखले जातात. शाहू महाराजांचे वंशज यामुळे मराठा समाजात चांगले स्थान आहे. केसीआर बहुजन, मुस्लिम समाजाला बरोबर घेवून चालतात. दोघांचे बंध जुळू शकतात.
प्रकाश आंबेडकर- एमआयएम आणि त्याचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे केसीआर हे मुस्लिम समर्थक नेते मानले जातात. केसीआर मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही मुस्लिम आहेत. उजव्या विचारसरणी विरोधात प्रकाश आंबेडकर यांची आक्रमक भाषा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. केसीआर यांची भाजपासोबत मोठी राजकीय लढाई होणार आहे.