Radhakrushna Vikhe: महसूल परिषदेतून विखेंनी साधले शक्तिप्रदर्शन
अहमदनगरः महसूल विभागाची परिषद नेहमी पुण्यातील यशदा (Yashdha) अथवा मुंबईतील मंत्रालयात होत असते. मात्र यंदा ही परिषद पहिल्यांदाच परिघा बाहेर चक्क एका गावात होत आहे. ते गावही साधसूध नाही तर महसूल मंत्र्यांचं गाव आहे. राज्यात पहिल्यांदाच महसूल मंत्र्यांच्या गावात ही परिषद होत असल्याने प्रवरा लोणीला आज प्रशासकीय महत्त्व आले आहे. या महसूल परिषदेतून राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushna Vikhe Patil) एकाच वेळी अनेक लक्ष्य साध्य केल्याची चर्चा आहे.
राज्यात सर्वाधिक कालावधी महसूल मंत्री राहिल्याचा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना दिला जातो. थोरात-विखे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. थोरातांचे जिल्ह्यातील महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने विखेंना महसूल मंत्रीपद दिले. या पदाचा उपयोग करत विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके व काँग्रेसचे नेते थोरात यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. थोरातांना महसूल मंत्री पदाच्या काळात जे करून दाखविता आले नाही ते विखेंनी आज महसूल परिषदेच्या माध्यमातून करून दाखविल्याचे बोलले जाते.
Shinde Vs Thackeray : एकनाथ शिंदे यांना दीडशे कोटींची लॉटरी लागणार?
राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुख्य सचिव, अवर सचिव, विभागीय सचिव, विभागीय आयुक्त, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रवरा लोणीमध्ये महसूल परिषदेसाठी आणले आहेत. यापूर्वी प्रवरा लोणीमध्ये दिवंगत खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य परिषद झाली होती. या परिषदेनंतर प्रवरा लोणी देशभरात वैद्यकीय शिक्षणाचे मोठे केंद्र म्हणून नावारुपाला आले. तेवढ्याच ताकदीने राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा लोणीमध्ये महसूल परिषद घेतली आहे. आज (बुधवार) व उद्या (गुरुवार) असे दोन दिवस ही परिषद सुरू आहे. यातून प्रवरा लोणीमध्ये प्रशासकीय व राजकीय ताकद विखे वाढवतील असे बोलले जात आहे.
बाळासाहेब थोरातांना त्यांच्या महसूलमंत्री काळात अशी परिषद संगमनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी घेता आली नाही. मात्र विखे पाटलांनी प्रवरा लोणीसारख्या गावात ही परिषद घेऊन आपण महसूल मंत्री म्हणून कसे सरस आहोत. हे दाखविण्याच प्रयत्न केला आहे. आता लोणीमध्ये आलेले ही प्रशासकीय ताकद विखे पाटील कशी वापरणार हे लवकरच कळणार आहे.