राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

नागपूर : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर होते. त्यामुळं नागपुरात राज ठाकरे कोणाला भेटणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या या भेटीचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

राज ठाकरे यांनी आज नागपुरात मनसे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. तर राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीदरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. तर या भेटीबाबत विधीमंडळातील कामकाजासह अन्य विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी भेटीचे फोटो ट्विट करत दिली आहे.

या भेटीबाबत मनसेनेही ट्विट करत माहिती दिली असून ट्विटमध्ये म्हटलं की, ”राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याचंच औचित्य साधून राज ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री यांच्या दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली, असं म्हटलं आहे.

दरम्यान, या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. तर येणाऱ्या काही दिवसांनी राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube