राऊतांच्या अडचणीत वाढ! श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यानंतर आता बीडमध्येही गुन्हा दाखल
बीडः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे नेहमीच राजकीय वादाचे धनी ठरत असतात. राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना जबाबदार धरले होते. यानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी केली होती. यानंतर त्यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली होती. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर आता बीड येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय त्यांच्याविरोधात शिवसेना(शिंदे गट) नेतेही आक्रमक झाले आहेत. शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. आज राऊत यांच्या फोटोला चप्पल मारली आहे. त्यांनी असेच आरोप केले तर महिला सेनेला त्यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच राऊतांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला म्हात्रे यांनी दिला आहे. त्यांतर राऊत यांच्याविरोधात काल ठाण्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे, असाही आरोप मिनाक्षी शिंदेंनी केला आहे. दरम्यान, आता बीडमध्येही राऊत त्यांच्यावर गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
Sanjay Raut : “नेता असाच असतो मोकळा ढाकळा” अजितदादांचा व्हिडीओ शेअर करत राणेंना टोला
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर टोलेबाजी केली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ‘सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल.