मराठा मोर्चाचा फोटो ट्विट करत संजय राऊत आले अडचणीत!
मुंबई : नुकताच महाविकास आघाडी सरकारचा महामोर्चा मुंबईत पार पडला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा मुंबईत निघाला. मात्र, भाजपकडून हा नॅनो मोर्चा असल्याची हेटाळणी करण्यात आली.
त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चाचा एक फोटो ट्विट करत मोर्चाला किती गर्दी होती, पहा असं आव्हान दिलं मात्र राऊतांच्या या फोटाबाबत नेटकऱ्यांनी हा फोटो मराठा क्रांती मोर्चाचा असल्याच्या कमेंटचा पाऊस पाडला आहे.
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
नेटकऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चाचा फोटो असल्याचं म्हंटलय. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत अडचणीत आल्याची चर्चा रंगलीय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चासाठी राज्यभरातून जोरदार तयारी करण्यात आली होती.
सुरुवातीला या मोर्चासाठी राज्य सरकारकडून ही परवानगी नाकारण्यात आली होती मात्र, नंतर विराट मोर्चाला परवानगी देण्यात आलीय. या मोर्चामध्ये महापुरुषांचा अवमान, सीमा प्रश्न, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या या मोर्चाला कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि मित्र पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. महाविकास आघाडीच्या महामोर्चाला किती गर्दी होती? यावरून सध्या राजकीय युद्ध रंगले आहे.
यामध्ये भाजपने हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याची हेटाळणी केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून संजय राऊत यांनी रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एक व्हिडिओ ट्विट करत देवेंद्रजी ही पहा गर्दी, असे आव्हान दिले.
दरम्यान, त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात असून हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यावरुन आता संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.