काल दिल्लीला अन् आज भीमाशंकरला…. मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त; संजय राऊतांचे टीकास्त्र
Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा निघाला नाही. अनेक नेत्यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जरांगेंशी चर्चा करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर आता याच मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला.
जालन्यातील मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाने आज ‘ठाणे बंद’ची हाक दिली आहे. याविषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना ठाणे बंदबद्दल विचारा… काल ते G-20 साठी दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. म्हणजे ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र, तंत्र, मंत्र, जादूटोणा यातच ते अडकलेले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल भाजपचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही, अशी टीका केली. याविषयी राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाल, मी राहुल गांधी यांचा व्हिडिओ पाहिला. पॅरिस विद्यापीठात एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. भाजपचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. मी त्यांच्याशी सहमत आहे. इंडियाचा भारत करणे, लोकांमध्ये भेद निर्माण करणे, हे हिंदुत्व नाही. हिंदुतत्व हा संस्कार आहे, संस्कृती आहे. हिंदु हा सुधारणावादी मार्ग आहे. हा धर्म लोकतंत्र मानतो. आणि भाजप किंवा मोदी हे संपवताहेत, असं राहुल म्हणत असतील तर भाजपनं एकदा चिंतन करावं, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जी-20 परिषदेसाठी दिल्लीत गेले होते. त्यानिमित्त आलेल्या पाहूण्यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते भीमाशंकर मंदिराला भेट देणार आहेत. मात्र, त्यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यामुळं राऊतांनी केलेल्य या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं आहे