Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर; म्हणाले, माझं वक्तव्य….
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांना मिळालेल्या हक्कभंग नोटीसीला उत्तर दिले आहे. यात त्यांनी माझा कुठेही विधानभवनाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर टीका करताना विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले होते, यावरुन बराच गदारोळ झाला होता. तेव्हा शिंदे गट व भाजपने संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती.
संजय राऊत यांनी त्यांना आलेल्या हक्कभंग नोटीसीला उत्तर दिले आहे. महाराष्ट्र घडवण्यामध्ये विधीमंडळाचा फार मोठा वाटा आहे. अनेक दिग्गजे नेते याठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या सभागृहाचा अपमान मी करणे हे शक्य नाही. या विधीमंडळाबद्दल मला मनापासून आदर आहे. मी जे चाळीस चोर असल्याचे वक्तव्य केलेले होते ते एका संबंधीत व्यक्तींपुरते मर्यादित होते, असे म्हणत त्यांनी पत्रामध्ये शिंदे गटाचा उल्लेख टाळला आहे. मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्या विपर्यास करण्यात आला. आपण ते वक्तव्य पुन्हा ऐकावे व त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे कोल्हापूर येथे होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला होता. त्याठिकाणी चाळीस चोर आहेत, असे ते म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष शेलार, अतुल भातखळकर तसेस शिंदे गटाचे विधानसभेचे प्रतोद भरत गोगावले हे आक्रमक झाले होते. त्यांनी राऊतांवर हक्कभंग आणावा याची मागणी केली होती.
Sanjay Raut : मोदी शाहांच्या मदतीने देश लुटणाऱ्या अदानींना साधी नोटीसही नाही; राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान राऊतांनी आज विरोधकांवर पडणाऱ्या धाडींवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या देशामध्ये विरोधकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. काल देखील लालूप्रसाद यादव यांच्या घरी धाड टाकण्यात आली. मनिष सिसोदिया यांना अटक झाली. एवढे असताना गौतम अदानी यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाही. ज्यांनी मोदी व शाह यांच्या मदतीने संपूर्ण देश लूटला त्यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे असत्य व चुकीचे आहे, त्याविरोधात आम्ही उभे राहणार, असे म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.