महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन शहाणे, त्यांना आज… संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून (MahaYuti) प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे. चंद्रपूरमधून महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात केली आहे. काल (8 एप्रिल) रोजी चंद्रपूरमध्ये असणाऱ्या महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेत काँग्रेससह (Congress) महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्ला केला होता.
तर दुसरीकडे आज लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत एकमत झाल्याने महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोणता पक्ष कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याची घोषणा करण्यात आली. मात्र या पत्रकार परिषदेआधी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त निवडला असं ते म्हणाले.
आजच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडी एकजुटीचं प्रदर्शन करेल. या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यासह समाजवादी पार्टी, डावे पक्षातील नेते उपस्थित होते. याचबरोबर या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 जागांपैकी 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला.
मविआमध्ये कोणताही वाद उरलेला नाही
आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. राज्याच्या राजकारणात देखील साडेतीन शहाणे आहे त्या साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त आम्ही निवडला असून, आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेत आहोत याचा अर्थ आमच्यात कोणताही वाद नाही. असंही राऊत म्हणाले.
साडेतीन शहाण्यांपैकी अर्धा शहाणा कोण?
राज्याच्या राजकारणातील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धा शहाणा कोण असं राऊतांना विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत म्हणाले की, त्या अर्ध्या शहाण्याची झोप कशाला उडवताय? उद्या तुम्हाला मी नक्कीच सांगेन. सरकार आणि त्यांचे सर्व लोक साडेतीन शहाणेचं आहेत. असं म्हणत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्ला बोल केला.
काही गोष्टींचा त्याग करावा लागतो
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, आम्ही रामटेक, अमरावती, कोल्हापूर या जागा काँग्रेससाठी सोडल्या. या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या भावनांशीही मी सहमत आहे मात्र देशात हुकूमशाही विरोधात लढताना आपल्याला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो असं संजय राऊत म्हणाले.