जिल्हा बँकेत भाजपला धक्का देणार ? शंभूराज देसाई-मकरंदआबा झेडपीचा वचपा काढणार !
Satara District Bank Election : भाजपचे 9, राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 4 संचालक विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या कुणाकडे जातात हे महत्त्वाचे आहे.
Satara District Bank election : तुम्हाला सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आठवतेय ना. हो तीच निवडणूक ज्या निवडणूक मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंदआबा पाटील यांचा भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व शिवेंद्रराजे भोसलेंनी करेक्ट कार्यक्रम केला होता. शिवसेना-राष्ट्रवादीकडे बहुमत असताना भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्षपद आपल्याकडे खेचून झेडपी सत्ता मिळविली होती. या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा झाला होता. थेट मंत्री शंभूराज देसाईंना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. महायुतीमध्ये जोरदार जुंपली होती. थेट विधानसभेत आवाज उठविण्यात आला होता. आता त्याचा वचपा काढण्याची नामी संधी जिल्हा बँकेत शंभूराज देसाई आणि मकरंदआबा पाटलांनी आलीय. जिल्हा बँकेत कोणीकडे संख्याबळ जास्त आहे, कुणाच्या हातात आता चाव्या आहेत हेच पाहुया…
शंभूराज देसाईंनी आपली ताकद दाखविली
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटणमध्ये ताकद दाखवून दिलीय. शंभूराज देसाईने सोसायटी मतदारसंघात भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. याच पराभवानंतर तब्बल 46 वर्षानंतर देसाई घरातील व्यक्ती बँकेत संचालक झाले. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी देसाईंनी घेरण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते. पण देसाई दोघांना वरचढ ठरलेत.
मंत्री जयकुमार गोरेंनी घेरण्याची रणनिती फोल
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना घेरण्यासाठी शिवसेनेचे जाळे टाकले होते. त्यांचे बंधू शेखर गोरे यांना विरोधात उतरविले होते. पण जयकुमार गोरे यांनी 53 मते घेत बाजी पलटवली. तर शेखर गोरेंना अवघे सात मते मिळाली. त्यामुळे शिवसेना तोंडघशी पडली.
ईश्वर चिठ्ठीचा ट्विस्ट
कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट आला. एक मतपत्रिका फाटलेली निघाल्याने ती बाद करण्यात आली.त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील माने व सुनील खत्री या दोघांना 44 असे समसमान मते मिळाली. त्यामुळे ही निवडणूक टाय झाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे सुनील माने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा वाढली.
संख्याबळ कुणाच्या बाजूने ?
जयकुमार गोरे, शंभूराज देसाईंनी विरोधकांनी आव्हान पलटून लावले पण बँकेची संख्याबळ कुणाच्या बाजूने हे पाहुया. बँकेत एकूण 21 जागा होत्या. त्यात नऊ जागा आधीच बिनबिरोध झाल्या होत्या. 12 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात एकूण 21 पैकी 9 जागा भाजपने जिंकल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा आणि शिवसेनेने चार जागा जिंकल्यात. म्हणजेच झेडपीप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास एकूण बारा संचालक होतात. त्यातून बँकेच्या चाव्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा आणि शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हातात येणार आहे. झेडपी झालेल्या राजकीय संघर्ष दोघेही विसरलेले नाहीत. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना राजकीय अद्दल घडविण्याची संधी दोघांकडे आहे.
रामराजे निंबाळकर हिशोब चुकता करणार ?
फलटण तालुका सेवा सोयायटीची जागा विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांनी जिंकली आहे. तेथून त्यांचे बंधू
संजीवराजे नाईक निंबाळकर हे विजयी झालेत. ते शिंदेसेनेचे आहेत. त्यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे थोरले बंधू
समशेरसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केलेला आहे. भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व मंत्री जयकुमार गोरेंनी केलेले आहे. त्यात बिनविरोध निवडून आलेले रणजितसिंह निंबाळकर हे अध्यक्ष शर्यतीत असल्याचे बोलेले आहे. पण जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर, रामराजे निंबाळकरांचे राजकीय वैर सूर्वश्रूत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष निवडीसाठी गोरे, रणजितसिंह निंबाळकरांना धक्का देण्याची रणनिती रामराजे निंबाळकरांची असणारच.
राष्ट्रवादी, शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार?
सातारा जिल्ह्यात आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बार्गिंग पॉवर दाखविता येणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला साताऱ्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला थेट आव्हान देता येते आणि ते आव्हान यशस्वीही करता येते हे निकालाने दिसून येत आहे. पण झेडपी प्रमाणे जिल्हा बँकेत तोंडचा घास हिसकावला जावू नये, एेवढी खबरदारी आता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंदआबा पाटील घेतील हे नक्की.