Satyajit Tambe : राजकीय प्रश्नांचं उत्तर वेळ आल्यावर देईन…पटोलेंच्या टीकेवर तांबेचे प्रत्युत्तर

Satyajit Tambe : राजकीय प्रश्नांचं उत्तर वेळ आल्यावर देईन…पटोलेंच्या टीकेवर तांबेचे प्रत्युत्तर

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीवरून राज्यात वातावरण तापले आहे. या निवडणुकीत सध्या चर्चा आहे ती म्हणजे तांबे पिता पुत्रांची. यातच तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. यावर सत्यजित तांबे यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. तसेच योग्य वेळ आली की सर्व राजकीय प्रश्नांचे उत्तर नक्की देईल असेही तांबे यावेळी बोलताना म्हणाले.

सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मला पाठिंबा देण्याबाबत जाहीर केल्यानंतर एक अधिकृत पत्रही देण्यात आलं. टीडीएफसह शिक्षक भारतीने देखील मला पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. मी अपक्ष उमेदवार असलो तरी मला पाठिंबा देण्याचं काम अनेक संस्था आणि संघटनांनी केलं आहे.

दरम्यान विधान परिषदेतील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना पक्षाकडून उमेवारी जाहीर केली मात्र त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही.

सुधीर तांबे यांनी त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबितही केलं. याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबेंवर टीका देखील केली.

यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, सर्व राजकीय प्रश्नाचे उत्तर मी आता देणार नाही, मात्र वेळ आली की मी याबाबत नक्की वेगळ्या व्यासपीठावर बोलेल. असे म्हणत एकप्रकारे सत्यजित यांनी नाना पटोले यांच्या टीकेला उत्तर देणं टाळल्याचे दिसून आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube