Satyajeet Tambe आग ओकत होते, तेव्हा नाना पटोले भराडी देवीच्या दर्शनाला गेले होते

Satyajeet Tambe आग ओकत होते, तेव्हा नाना पटोले भराडी देवीच्या दर्शनाला गेले होते

नाशिक : विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) यांनी आपल्या उमेदवारीवरून झालेल्या ‘नाट्या’वरचा पडदा उलगडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. बाळासाहेब थोरात आणि मला काँग्रेस मधून बाहेर काढण्यासाठीचं हे सारे षडयंत्र विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने झाल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केला.

नाना पटोले हेच या गटाचे ‘मास्टर माईंड’ असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख तांबे यांनी केला. सत्यजित तांबे यांच्या या आरोपानंतर साऱ्या माध्यमांच्या नजरा नाना पटोले यांच्याकडे वळाले. नाना पटोले हे कोठे आहेत ? याचा शोध घेण्यात आला तर पटोले हे भराडी देवीच्या यात्रेला आज गेल्याचे सांगण्यात आले. भराडी देवी हे अनेकांचे दैवत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाना पटोले यांच्यासह अनेक नेते आज त्या तीर्थक्षेत्री होते.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली झाल्याने गेल्या दोन दिवस नाना पटोले खुशीत आहेत. मात्र सत्यजित यांच्या आरोपानंतर पटोले हेच आता लक्ष बनल्याचे दिसून येत आहे.

 

नाना पटोले यांनी कशाप्रकारे आपल्याला एबी फॉर्म देताना गंडविले, याची सुरस कथा सत्यजित यांनी माध्यमांनाच ऐकवली. चुकीचे एबी फॉर्म देऊन मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सत्यजित यांनी केला. हे सारे पटोले यांनी केल्याचे त्यांनी नमूद केले. भराडी देवी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले. त्यांनी सत्यजित यांच्या आरोपावर थेटपणे उत्तर देण्यात नकार दिला यावर आमचे पक्षप्रवक्ते बाजू मांडतील असं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या निवडणुकीत काय काय झालं हे तुम्हाला माहित आहे हे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

नाना पटोले यांनी सत्यजित यांना कोरे एबी फॉर्म दिल्याचे निवडणूक प्रचारात वारंवार सांगितले होते. तसेच हा सारा निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून झाला होता, असेही नानांचे म्हणणे होते, तरी नाना यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केले. पक्षातील कोणत्या नेत्यांची नाना यांना साथ होती? सत्यजित यांना उमेदवारी न देण्यामागे काय हेतू होता? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आता नाना पटोले यांना द्यावी लागणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube