राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात नेमकं काय?

राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात नेमकं काय?

मुंबई : महाराष्ट्रात एका बाजूला इंडिया आघाडीच्या या महिन्यात होणाऱ्या बैठकीची तयारी सुरु आहे. पण त्याचवेळी या आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मात्र कमालीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जवळपास 4 वेळा झालेली भेट या संभ्रमाच्या वातावरणाचे प्रमुख कारण ठरले आहे. या वातावरणामुळे खुद्द महाविकास आघाडीमधूनच शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालंल आहे असा सवाल विचारला जात आहे. (Sharad Pawar and Deputy Chief Minister Ajit Pawar met four times after a month and a half of rebellion)

दीड महिन्यात चार भेटी :

नुकतीच शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. बंडानंतरच्या दीड महिन्यात ही त्यांची चौथी भेट ठरली. यापूर्वी शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच अजित पवार यांनी थेट सिल्व्हर ओकवरती जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. खरंतर या भेटीचे कारण प्रतिभाताई पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कौटुंबिक पातळीवर अजित पवार आणि शरद पवार यांचीही पहिलीच भेट ठरली होती.

‘चोर’ डिया नावावर जोर देत राज ठाकरेंनी काढला अजितदादा अन् पवारांना चिमटा

त्यानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे या नेत्यांसह 9 मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांसह सर्व आमदार आणि नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच या दोन्ही भेटी झाल्या. या सर्व भेटींमुळे वारंवार प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे काका-पुतणे यांची सतत भेट का होत आहे? शरद पवारांच्या मनात नेमंक काय चालू आहे?

आक्रमक पवार अन् नेते शांत झाले…

बंडानंतर सुरुवातीच्या 4 ते 5 दिवसांमध्ये अजित पवार आणि बंडखोरांविरोधात आक्रमक असणारे सर्वच नेते शांत झालेले दिसून येतात. यात स्वतः शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या सर्वच नेत्यांच्या नावाच उल्लेख करावा लागेल. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सारखे कोणताही नेता बंडखोरांविरुद्ध जाहीरपणे वक्तव्य करताना, अपात्रतेचा इशारा देताना दिसून येत नाही. येवल्यातील सभेनंतर पवारांनीही कुठेही जाहीर सभा घेतलेली नाही. इतकंच नाही तर राष्ट्रवादीत दोन गट नसल्याचे स्वतः शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे कळविले आहे.

थोरातांना उमेदवारी द्या, पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण उडवू : निरीक्षकांसमोरच कार्यकर्ते आक्रमक

पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न :

अजित पवार आणि शरद पवार यांच्या तीन भेटींमध्ये शरद पवार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावा, भाजपसोबत जाण्यासाठी विचार करावा, अशी गळ अजित पवार यांनी शरद पवार यांना घातली. त्यानंतर सर्व आमदारांनीही शरद पवार यांना अशाच प्रकारची विनंती करण्यात आली. तर तर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. पक्षाने एकत्र राहावे, असे आवाहन आम्ही शरद पवार साहेबांना केले आहे. असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.

राष्ट्रवादीतील गटाने वेगळी भूमिका घेतली आहे. आता आमचे काही हितचिंतक आमच्या भूमिकेत काही बदल करता येईल का, यासाठी प्रयत्न करत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनीही असे प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला. दरम्यान, भाजपसोबत आल्यास सुप्रिया सुळेंना केंद्रात बडे मंत्रिपद मिळेल अशीही ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पवार यांना निती आयोगाच्या चेअरमन पदाचीही ऑफर देण्यात आल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावर :

शरद पवार नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत टिळक ट्रस्टच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाले होते. मोदींसोबत व्यासपीठावर जाण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नाराज झाले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पवारांशी बोलून समारंभाला उपस्थित राहू नये म्हणून मन वळवण्याची विनंती करण्यात आली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या उपस्थितीमुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे म्हणत तीव्र विरोध केला होता.

नव्याने स्थापन झालेल्या विरोधी आघाडीने या कार्यक्रमाबद्दल आणि शरद पवार यांच्या उपस्थित राहण्याच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्ष भाजपसमोर एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे पवारांनी पंतप्रधानांसोबत व्यासपीठ जाण्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो. मात्र, या सर्व प्रकारानंतरही शरद पवार यांनी कार्यक्रमाला व्यासपीठावर सर्वप्रथम उपस्थिती लावली होती. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका काय?, या कार्यक्रमाला येण्याचा त्यांचा उद्देश काय? असे प्रश्न उपस्थित केले गेले. पण अखेरपर्यंत त्यांनी पत्ते उघड केले नाहीत.

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं

शरद पवार यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्द्यापासून ते अदानींच्या प्रकरणावरुन मित्र पक्ष काँग्रेसला फटकारलं होतं. बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था, महागाई यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले पाहिजे की अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे? असा सवाल त्यांनी विचारला होता. कृषी कायद्यांवरुनही शरद पवार यांनी काहीशी भाजपला पूरक भूमिका घेतली होती.

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच!

या सर्व मुद्द्यावर काही हितचिंतक आपले मन वळवण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण भाजपसोबत जाणार नाही म्हणजे नाही, असं म्हणतं पहिल्या दिवसापासूनच पवारांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती राष्ट्रवादीच्या धोरणात बसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझा पक्ष भाजपसोबत जाणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मागची निवडणूक एकत्र लढवली होती. त्यामुळे वैचारिक भूमिका बदलता येत नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

कौटुंबिक भेट आणि राजकीय भेट वेगवेगळी :

या भेटींबाबत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून वारंवार दावा केला जातो की या केवळ कौटुंबिक भेटी आहेत. प्रतिभाताई पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकारण वेगळे आणि कुटुंब वेगळे, असे स्वतः अजित पवार म्हणाले होते.तर शनिवारच्या गुप्त भेटीनंतर अजित पवार माझा पुतण्या आहे. माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे? कुटुंबातील कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीला कुटुंबातील इतर सदस्यांना भेटायचे असेल तर त्यात कोणतीही अडचण नसावी, असे शरद पवार म्हणाले होते. सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार माझा दादा आणि कायम दादाच राहिलं असं म्हणतं भावनिक बंध तुटू दिलेला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube