Sharad Pawar : निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतं की त्यांच्यापाठी कोणी आहे?
पुणे : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या (Chinchwad By Election)मतदानाला फक्त चार दिवस उरले असताना शरद पवार (Sharad Pawar)महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)उमेदवार नाना काटे (Nana Kate)यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना शिवसेना आणि शिवसेना (Shivsena)पक्षचिन्हाबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यावर पवार म्हणाले की, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतं की यांच्या पाठी कोणी आहे? हे पाहावं लागेल, असं सांगतानाच पण कट्टर शिवसैनिक 100 टक्के उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यासोबत आहे. हे पुढील निवडणुकीत दिसून येईल, असं ते म्हणाले.
जेव्हा सत्तेचा अतिगैरवापर केला जातो आणि एखाद्या पक्षाला किंवा पक्षनेतृत्त्वाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी लोक त्या पक्षाच्या बाजूनं उभे राहतात, मला 100 टक्के खात्री आहे. मी काल नगर जिल्ह्यात होतो, परवा सांगली जिल्ह्यात होतो, त्याच्याआधी मराठवाड्यात होतो, मी लोकांशी संवाद साधत होतो, त्याच्यामध्ये नेतेलोक पक्ष सोडून गेले पण कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं दिसून येतंय.
Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?
आज सकाळपासूनच शरद पवार चिंचवड विधानसभा क्षेत्रात काही ठिकाणी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठका घेत आहेत. या बैठकीत स्वतः शरद पवार कार्यकर्त्यांना आगामी मतदानाविषयी मार्गदर्शन करत आहेत.
यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीतील राहुल कलाटे यांच्या बंडखोरीवरही भाष्य केलं. पवार म्हणाले की, माझा एक अनुभव आहे. ऐनवेळी केलेल्या बंडखोरीने काही फरक पडत नाही. चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे, असं सांगतानाच प्रत्येक व्यक्तीला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.