‘भाजप उभी केली नाथाभाऊ आणि प्रमोद महाजनांनी’ एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात शरद पवारांचं मोठं विधान

महाराष्ट्रात भाजप उभी करण्यात नाथाभाऊ आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान असल्याचे शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 30T145959.826

Sharad Pawar’s major statement : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुक्ताईनगरमध्ये आज विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, एकनाथ खडसे यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले असून महाराष्ट्रात भाजप उभी करण्यात त्यांचे आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान असल्याचे शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. मात्र, या कार्यक्रमाला भाजपचे एकही वरिष्ठ नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. याच कार्यक्रमात शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील राजकीय प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्रात भाजपची संघटना मजबूत करण्यात खडसे यांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.

एकनाथ खडसे यांनी अनेक वर्षे मुक्ताईनगरसह या परिसराची सेवा केली असून मतदारांनीही त्यांच्यावर वारंवार विश्वास दाखवला, असे शरद पवार म्हणाले. अनेक वर्षे या भागाची सेवा करण्याचं काम एकनाथ खडसे यांनी केलं. या मतदारसंघाने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेकवेळा निवडून दिलं. त्यांनी विधिमंडळातही आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला, अशा शब्दांत शरद पवार यांनी खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केला.

“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!

विधानसभेतील एकनाथ खडसे यांच्या कामाची आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, 1967 मध्ये मीदेखील महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून गेलो. विधानसभेच्या सभागृहात दोन माणसांची भाषणे कायम लक्षात राहिली. त्यापैकी एक पाटील आणि दुसरे नाथाभाऊ. सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले. विधानसभेत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे भूमिका मांडण्याची खडसे यांची शैली प्रभावी होती, असेही पवारांनी सांगितले.

मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांचाही शरद पवार यांनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला. मंत्रिमंडळात गेल्यानंतर एकाचवेळी तब्बल 12 खाती सांभाळणारे एकनाथ खडसे हे एकमेव मंत्री होते, असे सांगत त्यांनी खडसे यांच्या प्रशासकीय अनुभवाचे कौतुक केले. विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना खडसे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचेही पवार म्हणाले.

यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील योगदानाबाबत केलेल्या वक्तव्याने. नाथाभाऊंनी भाजपमध्ये काम केलं. महाराष्ट्रात भाजप उभी कुणी केली असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचं नाव घ्यावं लागेल, असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात भाजपच्या विस्तारामध्ये एकनाथ खडसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत त्यांनी जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला.

नाथाभाऊंच्या मनात दडलं काय? राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा; अमृत महोत्सवात खडसेंच्या भावनांचा बांध फुटला

उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यापासून ते विधिमंडळात पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यापर्यंत एकनाथ खडसे यांनी अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतरच्या काळात राजकीय परिस्थिती बदलली आणि खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या भाजपमधील योगदानाची शरद पवार यांनी जाहीरपणे दखल घेतली.

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली, तर दुसरीकडे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या उभारणीत एकनाथ खडसे आणि प्रमोद महाजन यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केल्याने त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

follow us