कर्डिले विखेंच्या जवळ गेले आणि अजित पवारांवर टोकाचे बोलले

  • Written By: Published:
कर्डिले विखेंच्या जवळ गेले आणि अजित पवारांवर टोकाचे बोलले

अशोक परुडे
Ahmednagar Politics: नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे झाल्याने त्यांचा कृतज्ञता सोहळा नगर तालुक्यात झाला. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजप नेते शिवाजी कर्डिले, विखे पिता-पुत्रांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली आहे. या सर्वांचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होता.

पूर्वी राष्ट्रवादीत पंधरा वर्ष राहिलेले शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कर्डिले आणि खासदार सुजय विखे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या पिता-पुत्रांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धक्का दिला होता. त्यानंतर साकळाई योजनेच्या कार्यक्रमात शिवाजी कर्डिले यांनी अजित पवार, राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवर चांगलेच आरोप केले आहेत.

‘जलजीवन मिशन योजने’वरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…

राष्ट्रवादीमध्ये असताना राष्ट्रवादीने साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. पण मंजुरी तर लांबच पण अजित पवार हे पाणी परिषदेलाही उपस्थित राहिले नाही, अशी टीका कर्डिले यांनी केली होती. याच बरोबर तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर कर्डिले यांनी निशाणा साधला होता.

कुकडीच्या पाण्यावरून पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात कायमच राजकीय संघर्ष सुरू असतो. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर आरोप केले जातात. विखे कुटुंबाकडून यावरून पवारांवर निशाणा साधला जातो. आमदार राम शिंदे हे पवारांवर टीका करणे सोडत नाही.

कर्डिले हे राष्ट्रवादीवर टीका करतात. परंतु कालच्या भाषणात सर्वाधिक काळ हे अजित पवार, राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवर ते जास्त बोलत होते. व्यासपीठावर पवारविरोधक विखे होते, त्याचे एक कारण आहे. आता कर्डिलेंसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे जिल्ह्यातील नेते आहेत. दक्षिणेतील राष्ट्रवादीचे ताकद कमी करण्यासाठी कुकडीतील पाणी, साकळाई योजनेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर पवार विरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्यांना भाजपकडून राजकारणात मोठी बक्षीसे मिळते. त्यांना भाजप पक्षाकडून जास्त ताकद मिळते.

अजित पवारांवर टीका करणे हे जुने राजकारणाचे कारण तर आहे. कर्डिले यांना सोडणाऱ्या काही कार्यकर्त्यांना, नेत्यांना राष्ट्रवादीने बळ दिलेले आहेत. त्यामुळे कर्डिले हे अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यामुळे कर्डिले ही पवारांवर टीका करत असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकाच्या दृष्टीने पवारांवर टीका करणे कर्डिलेंच्या राजकारणासाठी महत्त्वाचे आहे. कुकडी, साकळाईच्या मुद्द्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसला, राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेरणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube