Cow Hug Day : मिठी मारल्याने महाघोटाळ्याचे पाप धुतले जाणार का ? ‘सामना’ तून मोदी सरकारवर हल्लाबोल
मुंबई – प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात 14 फेब्रुवारीला जगभरात साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) ऐवजी गाईला मिठी मारा असे फर्मान केंद्रातील मोदी सरकारने सोडले आहे. सरकारच्या या निर्णयावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्र सामनामधून सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशातील शेतकरी पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःच्या पोरांचे पोट कसे भरायचे या विवंचनेत असताना सरकार मात्र ‘बिग बुल’ अदानी (Gautam Adani) यांना मिठी मारून बसले आहे. गाईला मिठी मारल्यास अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुऊन निघणार आहे का, उधळलेल्या ‘बिग बुल’ च्या गुन्ह्यांची चौकशी मोदी सरकार करणार आहे का, असे सवाल या अग्रलेखाद्वारे मोदी सरकारवर डागण्यात आले आहेत.
गाय ही हिंदुस्थानी संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती कामधेनू आणि गोमाता म्हणून ओळखली जाते. गाईला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. त्यामुळे गाईला मिठी मारा, असे फर्मान पशू कल्याण मंडळाकडून निघाले. लोकांना अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते, पण मोदी सरकारने लोकांना पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केल्याचे लेखात म्हटले आहे.
अदानींवर मौन, संघाच्या हिंदुत्वावर टीका
अदानी शेअर बाजारातील बिग बुल आहेत. पंतप्रधान त्याला मिठी मारून बसलेत. ती मिठी जराही सैल करायला ते तयार नाहीत. लोकांनी विचारले त्या मिठीचे रहस्य काय, त्याचे उत्तर न देता त्यांनी फर्मान काढले. लोकांनी गाईला मिठी मारावी. भाजपाचे व संघाचे हिंदुत्व हे असे आहे. संघाचे सरकार्यवाग दत्तात्रय होसबळे यांनी काही दिवसांपूर्वी जयपुरात एक खळबळजनक विधान केले. त्यांनी सांगितले, गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे आहेत. म्हणजे गाईंना खाटीकखान्यात न्यायची परवानगीच संघाने दिली व इकडे मोदी सरकारने ‘काऊ हग’ (Cow Hug Day) म्हणजे गाईस मिठी मारण्याचे फर्मान सोडले. गोमांस खाणाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या याचे उत्तर देशाला मिळायला हवे. यावर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी जनतेकडे मते मागताना सांगण्यासारखे काहीच नसल्याने मोदी सरकार देशाल पुनः पुन्हा धर्म आणि भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
सरकारसाठी ते ‘होली काऊ’
देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पशुधनाच्या चारा-पाण्याचे वांधे झाले आहेत. अस्मानी सुलतानीच्या कचाट्यात भरडून निघालेला शेतकरी पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःच्या पोरांचे पोट कसे भरायचे या विवंचनेत आहे. त्याची विवंचना दूर करण्याचे सोडून सरकार असे फर्मान सोडत आहे. दुसरीकडे स्वतः बिग बुल अदानी यांना मिठी मारून बसले आहे. अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असले तरी मोदी यांच्यासाठी ते ‘होली काऊ’ आहेत. तसे नसते तर या ‘होली काऊ’ साठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता. इकडे गोमाता चारा पाण्याशिवाय हंबरते आहे आणि सरकार बिग बुलसाठी दाणा पाण्याचे पाहत असल्याचे सामनाच्या अग्रलेखात अधोरेखित करण्यात आले आहे.