Shivsena Hearing : निर्णय काहीही लागला तरी भाजपचाच फायदा….आंबेडकरांनी मुद्देसूद सांगितला
शिवसेनेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी भाजपचलाच फायदा होणार असल्याचं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
Prakash Ambedkar On Shivsena Hearing : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (Shivsena Hearing) चिन्हाबाबत सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी भक्कमपणे आपली मांडली आहे. सुनावणीमध्ये सुरु असलेल्या युक्तिवादावरुन शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत केलंय. सर्वोच्च न्यायालयाचा काहीही निर्णय लागला तरीही भाजपचाच फायदा होणार असल्याचं भाकीत आंबेडकरांनी केलं आहे.
शिवसेना-धनुष्यबाण वादात ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत मोठ्या घडामोडी
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल, असं भाकीत आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, याचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे. मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतर वरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसणार असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.