Maharashtra Politics : ‘…पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली’, संजय राऊतांचं सूचक ट्वीट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्याने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं. याविरोधात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट (Thackeray group) विरुद्ध शिंदे गट (Shinde group) अशी थेट लढत राज्याच्या राजकारणात बघायला मिळत आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं एक ट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘थोरांचे विचार’ असं लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये थोर राजकीय विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक विधान नमूद करण्यात आलं. यात सत्ता आणि सत्ताधारी व्यक्ती यांविषयी बर्नार्ड शॉ यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये ‘सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करत नाही. पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते, असं विधान या फोटोमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या फोटोबरोबरच संजय राऊतांनी कोणतीही टीका किंवा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि निवडणूक आयोगाचा निकाल या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या या ट्वीटचे अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. त्यांचं हे ट्वीट म्हणजे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा सांगितलं जात आहे.