विरोधकांच्या ‘त्या’ टीकेवर श्रीकांत शिंदे संतापले, ‘कशा प्रकारच्या टीका करायच्या हे विरोधकांना समजायला पाहिजे’
नाशिक : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं (varsha’s bungalow) ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आला. त्यानंतर विरोधी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी या खर्चा संदर्भात भाष्य केलं. वर्षावरील जेवणावर तीन महिन्यात तब्बल दोन कोटी 38 लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र वर्षा निवासस्थानी जो खर्च झाला आहे तो आमच्या परिवाराचा नसल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.
श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये खासदार रोजगार मेळाव्याच्या (Rojgar Melava) कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, गेल्या ३ महिन्यात तब्बल दोन कोटी 38 लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
विरोधकांची टीका काय?
अजित पवारांनी वर्षा बंगल्यावरील खानपानाच्या बीलाविषयी बोलतांना मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली होती. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते, परंतु महिन्यातील बील एवढे कसे. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का काही कळायला मार्ग नाही. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली होती.
संशयित आरोपी हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री.. पत्रकार वारिसे हत्येप्रकरणी अजितदादांना वेगळाच संशय
विरोधकांच्या या टीकेवर बोलतांना श्रीकांत शिंदे म्हणाले, राजकारणाचा स्तर खालावला आहे, कशा प्रकारच्या टीका करायच्या हे देखील समजलं पाहिजे. वर्षा या निवासस्थानी जो खर्च झालाय तो आमच्या परिवाराचा खर्च नाही. महाराष्ट्रातील जे नागरिक मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी येतात, त्यांच्या चहा पाण्यावर खर्च होतो. डेव्हलपमेंटचं राजकारण केलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री च्या पद्धतीने काम करता ते बघून विरोधकांचे पाय घसरत चालले आहे, असंही त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाविषयी बोलतांनी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे काय करतील त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्या गटासाठी तो त्यांचा प्रश्न असून मला त्यावर बोलायचं नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचे शिंदे यांनी टाळले.