वाजे-कोकाटेंमध्ये ‘राजकीय सेटिंग’ की ‘टफ फाईट’ होणार? तिसरा भिडूही सज्ज
लोकसभा निवडणुकीत नाशिक (Nashik) मतदारसंघातून अगदी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी दिली. विजय करंजकर (Vijay Karanjakar) यांचे नाव चर्चेत असतानाही ठाकरेंनी वाजे यांना आशीर्वाद दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण निकालानंतर ठाकरे यांचा हा निर्णय योग्य ठरला. महायुतीच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा पराभव करत वाजे निवडून आले. वाजेंच्या या विजयात सगळ्या मोठा वाटा ठरला तो त्यांच्याच सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा. सिन्नरमधून वाजे यांना थोडे थोडके नव्हे, तर तब्बल 1 लाख 28 हजार मतांचे लीड मिळाले. याच लीडच्या जोरावर वाजेंनी मैदान मारले.
आता वाजेंचा डोळा आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे. दुसऱ्या बाजूला याच लीडमुळे इथले विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हे काहीसे टेन्शनमध्ये आले आहेत. कोकाटे यांचाही सिन्नर मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. पण वाजे हे खासदार झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आता तुल्यबळ उमेदवार नसेल, अशीही एक राजकीय चर्चा आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाच्या वाटेला जाणार? माणिकराव कोकाटेंविरोधात कोण तगडा उमेदवार असणार? कोकाटे-वाजे यांच्यात तिसऱ्या कोणत्या भिडूचा ‘उदय’ होणार का? (Sinnar Assembly Constituency, there is a fight between Rajabhau Waje of Shiv Sena UBT and Manikrao Kokate of NCP)
याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये
जुन्या राजकीय इतिहास पाहिला तर सुरुवातीला या मतदारसंघावर वाजे कुटुंबियांचे वर्चस्व होते. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा आणि तत्कालिन काँग्रेसचे नेते शंकरराव वाजे हे या मतदारसंघाचे पहिले आमदार. 1967 मध्ये वाजे यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे इथल्या आमदार झाल्या. 1972 मध्ये काँग्रेसने रामकृष्ण नाईक यांनी तिकीट दिले. शंकरराव वाजे अपक्ष लढले. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर हा मतदारसंघ वाजे यांच्या ताब्यातून गेला.
1978 आणि 1980 मध्ये काँग्रेसचे सूर्यभान गडाख विजयी झाले. त्यानंतर 1985 ते 1995 असे सलग तीन टर्म तुकाराम दिघोळे आमदार झाले. 1985 समाजवादी काँग्रेसकडून, 1990 ला काँग्रेसकडून, तर 1995 ला ते अपक्ष म्हणून निवडून आले. अपक्ष निवडून येणे त्यांच्या पथ्यावर पडले. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ते ऊर्जा राज्यमंत्री झाले. 1999 च्या निवडणुकीपूर्वी दिघोळे राष्ट्रवादीत गेले. तर शिवसेनेने माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली.
घोलप कुटुंब फुटीच्या वाटेवर; पण अहिरेंना हरवण्याचा पवारांचा चंग
कोकाटे यांनी दिघोळे यांचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव केला. 2004 ला पुन्हा शिवसेनेचे कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे दिघोळे अशी लढत झाली. त्यात कोकाटे 20 हजारांच्या लीडने निवडून आले. 2009 ला माणिकराव कोकाटे काँग्रेसकडून रिंगणात उतरले. त्यावेळी शिवसेनेने त्यांच्याविरोधात राजाभाऊ यांचे वडिल प्रकाश वाजे यांना उमेदवारी दिली. दोघांमध्ये चांगलीच फाईट झाली. पण कोकाटे यांनी तीन हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत हॅटट्रिक केली. कोकाटे यांना 75 हजार 630 मते मिळाली होती. तर वाजे यांना 72 हजार 800 मते मिळाली होती.
2014 ची निवडणूक खऱ्या अर्थाने राजाभाऊ वाजे यांच्यासाठी टर्निंग पाँइट ठरली. मोदी लाटेत कोकाटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पण शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी कोकाटे यांचा वीस हजार मतांनी पराभव करत उट्टे काढले. वाजेंनी तब्बल 42 वर्षानंतर आमदारकी पुन्हा घरात आणली. 2019 ला महायुतीत भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याने कोकाटे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. कोकाटे आणि शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात टफ फाइट झाली. त्यात वाजे तीन हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोकाटे हे अजित पवार गटात गेले.
आताच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिले. त्यांनी शिवसेनेचे दोन टर्म खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांचा मोठा पराभव केला. यात वाजे यांना होमग्राउंड सिन्नरमधून मिळालेले मताधिक्य हा चर्चेचा विषय ठरला. कोकाटे आमदार असतानाही गोडसे यांना या मतदारसंघातून अवघी 31 हजार 254 मते मिळाली. तर वाजे यांना तब्बल एक लाख 59 हजार 492 मते मिळाली. वाजे यांना तब्बल एक लाख 28 हजार मतांचे लीड मिळाले. यामागे कोकाटे आणि वाजे यांची छुपी युती असल्याचीही चर्चा झाली. वाजे खासदार झाल्यास विधानसभेला आपल्यासमोर तगडा उमेदवार राहणार नाही, असा विचार करत कोकाटे यांनी गोडसे यांना मदत केली नाही, अशी राजकीय चर्चा आहे.
Ground Zero : जे. पी. गावितांसाठी लढाई सोपी; पवारांच्या घरातून आमदारकीही जाणार?
आता प्रश्न राहतो तो कोकाटेंविरोधात उमेदवार कोण? महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाईल. राष्ट्रवादीकडून कोकाटे हेच प्रमुख दावेदार आहेत. महाविकास आघाडीमध्ये मात्र या जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही ही जागा हवी आहे. राजाभाऊ वाजे यांची चुलती तेजस्विनी हेमंत वाजे यांच्या नावाची ठाकरे गटाकडून चर्चा आहे. पक्षाकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्याचे बोलले जाते. याशिवाय उदय सांगळे हे इथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ते गेल्या वीस वर्षांपासून सिन्नरच्या राजकारणात आहेत. ते आधी शिवसेनेते होते. त्यावेळी दादा भुसे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जात होते.
पण 2011 मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. त्यांची पत्नी शितळ सांगळे या नाशिक जिल्हा परिषदेचच्या माजी अध्यक्ष आहेत. सांगळे सध्या कुठल्याच पक्षात नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा ज्याला सुटेल त्यांच्याकडून निवडणूक लढण्याची तयारी आहे. सांगळे यांच्याबाबतीत जातीय समीकरणही उजवे ठरते.त्या वंजारी समाजाचे आहे. या मतदारसंघात वंजारी मतदार मोठ्या संख्येने आहेत. थोडक्यात काय तर कोकाटे यांच्यासमोर किरकोळ आव्हान नसणार आहे. वाजे यांच्या घरात उमेदवारी मिळाल्यास ते त्यांच्यासाठी ताकद लावतील. तर शरद पवार यांच्या पक्षाला उमेदवारी गेल्यास जो उमेदवार असेल त्यासाठी सहानुभूतीची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेला कमी पडलेले कोकाटे हे आव्हान कसे परतवून लावणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.