दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर तटकरे यांचं मोठं विधान; अजित दादांच्या त्या वक्तव्याचीही काढली आठवण
NCP Merger : अजित पवार यांच्या निधनानंतर मागे पडलेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत सुनील तटकरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या, असं विधान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. विलीनीकरणासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असती, असंही त्यांनी नमूद केलं. अजित पवार यांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडल्याचं सांगताना, आपण त्यांच्या जवळचे सहकारी असल्याने त्यांनी याबाबत आपल्याला सांगितलं होतं, असा दावाही तटकरे यांनी केला. दरम्यान, सध्या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पटेल यांनी राजकीयदृष्ट्या दुरावलो असलो तरी मनाने वेगळे झालेलो नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या विधानामुळे दोन्ही गटांतील संभाव्य राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, असं तटकरे यांनी सांगून वस्तुस्थिती मांडली आहे, असं शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांच्या मते, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी अपेक्षा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी विलीनीकरणाची चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी आम्ही या विषयावर बोलत होतो, तेव्हा त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं. आज तटकरे यांनी याबाबत वक्तव्य केल्याने त्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. दोन्ही पक्ष एकत्र असते तर राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचं चित्र वेगळं असतं, असंही शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू असलेल्या बैठकांचा आणि नेत्यांच्या भेटीगाठींचा घटनाक्रमही चर्चेत आहे. 19 ऑक्टोबरपासून सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या विविध बैठका झाल्या. 2 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर 4 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5 नोव्हेंबर रोजी छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींच्या भविष्यातील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
– 19 ऑक्टोबर: पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पक्षातील इतर नेते त्यांच्यासोबत नव्हते.
– 21 ऑक्टोबर: सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली.
– 23 ऑक्टोबर: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक झाली.
– 25 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरलं.
– मुख्यमंत्र्यांची भेट: या भेटीत अर्थ खात्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.
– 28 ऑक्टोबर: उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
– 1 नोव्हेंबर: कोअर कमिटीतील सर्व सदस्यांनी अचानक केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली.
– 2 नोव्हेंबर: सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत कोअर कमिटीची पुन्हा बैठक झाली. याच दिवशी पुण्यात अस्वस्थ वाटू लागल्याने शरद पवार यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
– 3 नोव्हेंबर: कोअर कमिटीची आणखी एक बैठक झाली. मात्र, या दोन्ही बैठकांमधून काही निष्पन्न झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
– 4 नोव्हेंबर: दोन दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती आहे. रात्री त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
– 5 नोव्हेंबर: दुपारी छगन भुजबळ यांनी, तर रात्री प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली.