‘जीना यहाँ, मरना यहाँ’ म्हणत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देणारे सुप्रीम कोर्टाचे ‘ते’ न्यायाधीश निवृत्त
Supreme Court Judge M.R. Shah retired : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पूर्ण झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर 11 मेला सत्तासंघर्षाचा निकाल लागला होता त्यांच कारण म्हणजे न्यायाधीश एम.आर. शहा (M.R. Shah) हे 15 मे निवृत्त होणार होते. त्यानुसार आज एम. आर. शाह निवृत्त झाले. यावेळी कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ते कोर्टरूममध्ये भावूक झाले.
सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायाधीश एम. आर. शाह आज निवृत्त झाले. यावेळी ते म्हणाले की, मी निवृत्त होणार नाही आणि आयुष्यातील एक नवीन इनिंग सुरू करणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (D.Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील औपचारिक खंडपीठाचा भाग असलेल्या न्यायमूर्ती एम.आर. शाहांना भाषणाच्या शेवटी अश्रू अनावर झाले. त्यांनी राज कपूर यांच्या ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी गायल्या.
कर्नाटकात बंडखोरांचा दारुण पराभव; इकडं शिंदे गटाची धाकधूक वाढली
2 नोव्हेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले न्यायमूर्ती शाह यांच्या निवृत्तीमुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता 32 होईल. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी एक दिवस आधीच निवृत्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 आहे.
न्यायमूर्ती एम. आर. शाह यांचं खरं नाव मुकेशकुमार रसिकभाई शाह आहे. त्यांचा जन्म 16 मे 1958 रोजी झाला होता. 19 जुलै 1972 रोजी त्यांनी गुरजार विद्यापीठातून एलएलबी केली. त्यानंतर त्यांनी 20 वर्षे गुजरात उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. न्यायमूर्ती शाह यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील म्हणून काम केलं आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे वकील म्हणून ते कायम राहिले.
भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, लंडनहून परतताच राहुल नार्वेकरांचं मोठं विधान
2004 साली त्यांची गुजरात उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जून 2005 मध्ये ते गुजरात उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनले. त्यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली झाली आणि त्यांनी 12 ऑगस्ट 2018 रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती शाह यांची 2 नोव्हेंबर 2018 रोजी सुप्रीम कोर्टात नियुक्ती करण्यात आली. 15 मे 2023 रोजी चार वर्षाहून अधिक काळ सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले.