Supriya Sule : भारतात संस्था संपवण्याचे काम सुरु. लाेकं भयभीत
नवी दिल्ली ः देशात असाे की राज्यात प्रत्येक राज्यकर्त्यांच्या काळात काही ना काही हे बदल हाेतच असतात. त्यात वावगं असे काहीच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर देशात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाेकं भयभीत आहेत. त्याचा दाेष मी काेणा एका पक्षाला देणार नाही. परंतु, मी गेल्या काही वर्षांचा जेव्हा विचार करते. तेव्हा माझ्या असे लक्षात येते की, हे असा का हाेत आहे. त्याचं मुख्य कारण माझ्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनामुळे हे हाेत असल्याचे लक्षात येते. गेल्या काही वर्षांत देशातील संस्था संपवण्याचे काम सुरु आहे. गेल्या ६० वर्षांत उभ्या राहिलेल्या संस्थांवर (Instutution) सत्ताधारी भाजपकडून (BJP) हल्ले केले जात आहेत. त्यामुळे लाेकं भयभीत झाले आहेत. देशात भितीचे वातावरण त्यामुळे निर्माण झाले आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.
एका खासगी यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आराेप केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दर वेळी सत्ताधाऱ्यांकडून गेल्या ६० वर्षांत काय केले असे विचारले जात आहे. मी म्हणते की आता हा डायलाॅग जुना झाला आहे. भाजपने आता नवीन काही तरी सांगायला हवे. कारण गेल्या ६० वर्षात ज्या संस्था काँग्रेसने उभ्या केल्या, त्याची माेडताेड करण्याचे काम तसेच त्या विकण्याचे काम सध्या भाजपकडून सुरु आहे.
देशात गेल्या ६० वर्षात काहीच झाले नाही, असे ज्यावेळेस भाजप म्हणते. त्यावेळेस ते हे विसरतात की, गेल्या ६० वर्षात उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थामध्येच तुम्ही शिक्षण घेऊन इतके हुशार झाला आहात. त्यामुळे जनांची नाही पण मनाची लाज बाळगून ही डायलाॅगबाजी आता भाजपने बदलली पाहिजे आणि नवीन काही तरी लाेकांच्या कामाचे बाेलले पाहिजे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.