अप्पासाहेब जाधवांनी मारहाण केली? अंधारेंनी सगळा घटनाक्रमच सांगितला..
Sushma Andhare vs Appasaheb Jadhav : बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा अगदी काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाच ठाकरे गटात तुफान राजकारण सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी सुषमा अंधारे पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांना दोन कानशिलात ठेवून दिल्याचा दावा जाधव केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काल रात्रीच प्रतिक्रिया देत जाधव यांचे सर्व दावे फेटाळले होते.
बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या सभास्थळी नेमकं काय घडलं होतं, याचीही माहिती अंधारे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. अंधारे म्हणाल्या, ‘जाधव यांचे सर्व दावे खोटे आहेत. बॅनरवर फोटो नसल्याने जाधव रागात होते. मला मारहाण करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून एक सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’
ठाकरे गटाच्याच नेत्याची सुषमा अंधारेंना मारहाण, बीडमधील धक्कादायक प्रकार
‘आम्ही स्टेजची पाहणी केली. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पहिल्यांदाच महाप्रबोधन यात्रेला बीडमध्ये संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांचा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘काल एक मुलगा सभास्थळी होता. त्याठिकाणी जाधव यांची आधीपासूनच चिडचिड चालली होती. आमच्या पक्षाचे विनायक मुळे पदाधिकारी आहेत. त्यांनी जाधव यांचा फोटोच बॅनरवर छापला नाही. त्यामुळे ते चिडले होते. ते त्यांनी माझ्यासोर बोलून दाखवले. मी जिल्हाप्रमुखांना सांगितले फोटो लावून घ्या. ते म्हणाले, ताई आपण हे सर्व नंतर बोलू या.’
‘त्यानंतर बाजूला असलेल्या मुलाला जाधव म्हणाले, हे सामान इकडं का ठेवलंय ते उचला, दुसरीकडे ठेवा. त्या मुलाला त्याचा राग आला आणि तो म्हणाला तुम्ही मला का सांगताय ?, मी लेबर आहे का ?, यावरुव जाधव आणि त्या मुलात वाद झाले. धक्काबुक्कीही केली. यामध्ये जाधव यांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर आप्पासाहेब जाधव तेथून निघून गेले, असा खुलासा अंधारे यांनी केला.
Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
जाधव यांचा दावा काय ?
जाधव यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले, की ‘बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात येत होतं. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी पैसे त्या मागत आहेत.’ त्या माझं पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वादात मी त्यांना दोन चापटा मारल्या, असा दावा जाधव यांनी केला होता.
जाधव यांची हकालपट्टी
या घटनेचे आज सकाळपासूनच तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे. ठाकरे गटानेही या प्रकारची गंभीर दखल घेत जाधव यांना दणका दिला आहे. जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.