Maharashtra Politics : ‘पाटलाच्या नावातचं गुलाब, पण वास धोतऱ्याचा”, वरळीच्या सभेत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल
वरळी : ‘ज्याला नांदायचं नसतं त्याच्याकडं खूप कारणं असतात. शिंदे गटाला (Shinde group) बाहेरच पडायचं होतं, म्हणून ४० गद्दार वेगवेगळी कारणं देत आहेत”, असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी वरळीतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यामध्ये केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वरळीतील सभेला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी “वरळीच्या या सभेत आमच्याकडे एकही खुर्ची रिकामी नाही. आमच्याकडे खुर्च्या गुंडाळण्याची वेळ आली नाही, असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी मुखमंत्र्यांना लगावला.
… नावात गुलाब पण वास धोतऱ्याचा
सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, जळगावच्या पाटलांच्या नावात गुलाब आहे. पण वास धोतऱ्याचा येतो. त्यांनी आता शिवसेना सोडण्याचं नवीन गौप्यस्फोट केला आहे. ‘मी जाणार नव्हतो, मी गद्दारी करणार नव्हतो. पण मराठ्यांचा मुख्यमंत्री होतोय, म्हणून मी शिंदेसोबत गेलो.’, असं ते म्हणत आहेत. अरे दादा आता तू खरं बोलतोय की अगोदर खरं बोलत होतास ? कारण हीच लोकं अगोदर म्हणत होती की, आम्हाला निधी मिळत नाही. दुसरा सांगत होता की, साहेब मला भेटतच नव्हते. तिसरा सांगत होता की, महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्याकरिता आम्ही गेलो. यांना जर महाराष्ट्राची अस्मिता एवढीच प्रिय होती, तर मग माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असताना हे लोक कुठे गेले होते ? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं
शिंदे गटाचे नेते शिवसेनेतून पडण्याची जी कारणे सांगत आहेत, त्यामधील एकही कारण खरं नव्हतं. नंतर म्हणाले, आम्ही हिंदुत्त्वाकरिता गेलो. पण एकाही कारणावर हे लोक स्थिर राहत नाही. कारण त्यांचे मन खात आहे. प्रत्येक वेळेला त्यांना वाटतं की, शिवसैनिकांना काय सांगितल्यावर त्यांना पटेल की आम्हीच खरे आहोत. आता त्यांनी नवीन कारण समोर आणलं आहे. आता जर मराठा मुख्यमंत्र्यांचे कारण पुढे करत असतील तर आधीची सर्व कारणं खोटी होती. असं असेल तर एका अर्थाने ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याचीही दखल घ्यावी लागणार असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदेवर केली टीका
आमचं मूल्य मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचा मान सन्मान जपणे हा आहे. हे मूल्याधिष्टीत राजकारण बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये रुजवलं, आता शिंदे साहेब आडनाव बदलून ठाकरे लावतील का ? एकनाथ शिंदेंना आता ठाकरे आडनाव लावायची वेळ येईल का विचार करावं लागेल, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.