‘Satyajeet Tambe पक्षातून ढकलण्याचा प्रश्नच नाही’, तांबेंच्या आरोपांवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून विजय मिळवला आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वादविवाद पहायला मिळाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांना कधीही नाकारलेले नाही. नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसचीच होती. त्या ठिकाणी सत्यजीत यांचे वडील सुधीर तांबे हे सीटिंग एम एल सी होते. त्यांनी जर निवडणुकी आधी सांगितलं असतं की, वडिलांच्या जागी मला उमेदवारी द्या तर दिली असती, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते नांदेड येथे माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.
काँग्रेस पक्षातून मला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, या सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, “काँग्रेस पक्षातून बाहेर ढकलण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे होती तर पक्षश्रेष्ठींशी या विषयावर आधी बोलायला पाहिजे होते. ऐनवेळी अचानकपणे असा कोणताही बदल होत नसतो. एकदा पक्षश्रेष्ठींकडून नाव आल्यानंतर ते नाव बदलणे सत्यजीत यांना त्यांना शक्य झाले नसेल त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असू शकतो”, असे चव्हाणांनी सांगितले.
तसेच काँग्रेस पक्षामध्ये निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव निश्चित होण्यासाठी एक पद्धत आहे. उमेदवाराचे नाव पक्षश्रेष्ठींकडे कळविण्यात येते. त्यासाठी राज्यात राज्य निवड मंडळ आहे. त्यांच्यामार्फत राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत हा प्रस्ताव पाठवला जातो व राष्ट्रीय अध्यक्ष त्यावर शिक्कामोर्तब करतात. अचानकपणे असे कोणाचेही नाव बदलून दुसरे नाव घेता येत नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमध्ये अंतर्गत वादावादी पहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष निवडणूक अर्ज भरला. या घटनेनंतर सुधीर तांबे व सत्यजीत तांबे या पिता-पुत्रांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पक्षातून निलंबन केले आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे यांनी भरघोस मतांनी विजय प्राप्त केला असून विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदे घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक दोषारोप केले आहेत.