BJP ची नवी कार्यकारणी उद्या होणार जाहीर, बावनकुळेंची माहिती; कार्यकारणीत 1200 जण असणार

BJP ची नवी कार्यकारणी उद्या होणार जाहीर, बावनकुळेंची माहिती; कार्यकारणीत 1200 जण असणार

There will be 1200 people in BJP’s new function, 288 assembly coordinators : भारतीय जनता पार्टीची (Bharatiya Janata Party) नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी एक वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज ही माहिती दिली.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला आता साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. 12 ऑगस्ट 2022 ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा मानस आहे. आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करू, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल, असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.

288 विधानसभा समन्वयक
बावनकुळे म्हणाले, 288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनात्मक बदल पूर्ण करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.

अमृतकुंभ अभियान
जुने नवे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही काम करत आहोत. जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीच्या निर्माणापर्यंत 60-65 वर्षे वयाचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या नेतृत्वाचाही आदर करून त्यांना नानासाहेब तथा उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियानातून सहभागी करून घेत असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.

काँग्रेसला शरद पवारांची गरज का? बाळासाहेब थोरातांनी सांगितले कारण

दरम्यान, यावेळी त्यांनी ठाकरे गटाचाही समाचार घेतला. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. जे उद्धव ठाकरे बारसूच्या बाजूने होते ते उद्धव ठाकरे आता नौटंकी करायला चाललेत. खरंतर त्यांना तो अधिकार आहे का? तो अधिकार स्थानिकांचा आहे, अधिकार त्या प्रकल्पग्रस्तांचा आहे, याबाबत सरकार निर्णय घेईल. उद्धव ठाकरे यापूर्वी बारसूत प्रकल्प होण्याच्या बाजूने होते आणि शिल्लक सेना किंचित होत चालली आहे, ती शून्य होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असल्याची टीका बावनकुळेंनी केली.

उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व काय? कधी लोकांमधून आमदार, खासदार झालेत विधान परिषदेत बॅकडोअरने एंट्री हेच कर्तृत्व! २०२४ मध्ये रणांगणात उतरा, विधानसभा लोकसभा लढा, मग बघू! उद्धव ठाकरेंना चारी मुंड्या चीत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं ते म्हणाले.

अमितभाईंना भुईसपाट करण्याची भाषा ठाकरे यांनी केली. यावर बावनकुळे म्हणाले, मला वाटते स्वत: ठाकरे केव्हा भुईसपाट होतील ते कळणार नाही. तसेही भुईसपाट झालेच आहात, किंचित बाकी उरला आहात. तुम्हाला रोज तुमचे लोक सोडून जाताहेत, रोज पक्षप्रवेश होत आहेत. तुमच्याकडे राहायला कुणी तयार नाहीत, पण बोलणं मात्र असं आवेशात आहे. अमितभाईंवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. कुठे सूर्य आणि कुठे दिवा! कशाला हसे करून घेता?, असा खोचक टोलाही बावनकुळेंनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube