स्वतः जखमी असताना आमदार गोरेंनी केली सहकाऱ्यांची मदत
सातारा : भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.
जयकुमार गोरे यांच्यासह या गाडीमध्ये 4 आणखी लोक होते ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. या गाडीमध्ये आमदार गोरे यांच्यासह स्वीय सहायक रुपेश साळुंखे, कार्यकर्ता कैलास दड्स आणि अंगरक्षक बनसोडे हे होते. तर यावेळी अपघात झाल्यानंतर आमदार गोरे यांनी आपल्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीसाठी दाखवलेल्या समय सूचकतेचं मात्र कौतुक होत आहे.
अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेतच गोरेंनी वेळ न घालवता अपघाताची माहिती आणि परिस्थिती खासदार रणजितसिंह निंबाळकर, स्वीय सहायक अभिजित काळे आणि पोलिसांशी संपर्क करून दिली आणि मदत मागितली. यामुळे अपघातात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे-पंढरपुर रोडवर फलटणजवळ मालथनच्या स्मशानभूमीजवळ जयकुमार गोरेंची फॉर्च्यूनरएसयूव्ही कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली. प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यावर फलटणमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहे.
जयकुमार गोरे यांच्यासह या गाडीमध्ये 4 आणखी लोक होते ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर जखमींना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे आमदार पुण्याहून दहिवडी या त्यांच्या गावी जात होते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने झोपेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि फॉर्च्युन ब्रिजची रेलिंग तोडून 50 फूट खाली पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.