Politics Issue: शिवसेना कोणाची? आज होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. शिवसेना (shivsena) कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. आज निकाल येण्याची दाट शक्यता आहे. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना नेमकी कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होईल.
दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्षप्रमुख पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 ला संपणार आहे. पुन्हा निवडीसाठी परवानगी देण्यात यावी किंवा हा कायदेशीर पेच संपेपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटानं आयोगात केली होती.
राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट व शिंदे गटात धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हासाठी लढाई सुरु झाली. राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केलाय.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा केला होता. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. तर दुसरीकडे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद बेकायदा असल्याचा युक्तिवाद केलाय. शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्यामुळे शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचं जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितलं होतं.
शिवसेनेच्या ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.
शिंदे गटानं 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रं आयोगाकडे सादर केली आहेत.