दावोसच्या दौऱ्यासाठी 40 कोटींची उधळपट्टी कशाला?, अजित पवारांनी सुनावले खडेबोल
मुंबई : कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget sessions) सुरूवात झाली. विरोधी पक्ष विविध मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विधीमंडळाच्या कामकाजांनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधतांना सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्होस दौऱ्यावरूनही अजित पवारांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील 19 कंपन्यांशी 1 लाख 37 हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केला आहे. मात्र यातील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातल्याच आहेत. मग राज्यातील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय होती? असा सवाल करत दाव्होस दौऱ्यासाठी राज्य सरकारने अडीच दिवसांसाठी ४० कोटी रुपये खर्च केले, यावरूनही अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणातून राज्याला काही दिशा मिळेल, राज्यासमोरील प्रश्नांबाबतच्या उपाययोजना समजून येतील, काही नवीन धोरणे राज्यापुढे मांडली जातील, अशी जनतेला अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला असून सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले असल्याची टीका त्यांनी केली.
शेतकरी, शेतमजूर, गरीब जनतेशी सरकारला देणंघेणं राहिलेले नाही. महिला आमदारांवर हल्ला होतो, सामान्य महिलांवर अत्याचार होतात. पण महिलांची सुरक्षा, कल्याणासंदर्भात सरकारकडे धोरण नाही. दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होत आहे. आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे ते म्हणाले.
Ajit Pawar म्हणाले… दळभद्री गाडीवर प्रसिध्दीसाठी सरकारने ५० कोटींचा चुराडा केला
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात आली. मात्र या स्मारकाचे पुढे काहीही झाले नाही, त्याचा साधा उल्लेख सुध्दा अभिभाषणात करण्यात आला नाही. केवळ राजकारणासाठी महाराजांच्या स्मारकांचे घाईत भूमीपूजन उरकण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख भाषणात नाही. हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा विसर सरकारला पडल्याच ते म्हणाले.